आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
सामाजिक जाणीव
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे...
जयवंत दळवी
अनिल अवचट
'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी' हे 'पु. ल. देशपांडे फाऊंडेशनचे' बोधवाक्य होते. तुकोबाच्या उपदेशाला स्मरुन पुलंनी समाजाकडून मिळालेले धन समाजालाच मुक्त हस्ताने देऊन टाकले. सुनीताबाईंनी सुरू करुन कार्यान्वित केलेल्या पु. ल. देशपांडे फाऊंडेशन कडून लाभलेल्या आर्थिक सहाय्यातून उभ्या राहिलेल्या सार्वजनिक हितांच्या कामांपैकी काही.
फाऊंडेशनच्या कार्याला सुरुवात झाली ती अंधांसाठी ब्रेल लिपीतून मराठीतील उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या कामापासून. याच कार्यासाठीचे एक लाख रुपये त्यानंतर श्री. बाबा आमटे यांच्या आनंदवनातील अंध विद्यार्थ्यांच्या कार्याला म्हणून देण्यात आले. त्या रकमेतून अंधांसाठी बंदिस्त सभागृह आणि खूप मोठे खुले नाट्यगृह उभे करण्यात आले. फाऊंडेशनचे हे पहिले मुक्तांगण. त्यानंतर जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सार्वजनिक संस्थांमधे फाऊंडेशनच्या सहकार्यातून अनेक मुक्तांगणे उभी राहिली.
प्रामुख्याने दलित विद्यार्थ्यांसाठी पु. ल. देशपांडे फाऊंडेशनच्या सहकार्यातून उभे राहिलेले मुक्तांगण नवविचार प्रेरणा केंद्र, सातार.
प्रामुख्याने कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या मुलांसाठी तानाजीराव बाबर आणि त्यांचे सहकारी यांनी सुरु केलेल्या शिक्षणसंस्थेला प्रयोगशाळेची असलेली निकड लक्षात घेऊन फाऊंडेशनतर्फे जेव्हा प्रथम आर्थिक मदत द्यायची ठरले त्यावेळी त्या प्रयोगशाळेला कणाद प्रयोगशाळा असे नाव द्यावे असे सुनीताबाईंनी सुचविले. हेतू हा की या नावाबद्दल विद्यार्थ्यांना कुतूहल निर्माण झाल्यास त्या थोर ॠषीबद्दल त्यांना माहिती देता येईल. शेतात पडलेले धान्याचे कण केवळ उदरनिर्वाहापुरते गोळा करायचे आणि बाकीचा वेळ ग्रंथ रचना करायची अशी या ॠषींची दिनचर्या असे. जगात परमाणूची कल्पना कणाद ॠषींनी प्रथम मांडली, हे मुलांना कळावे. यानंतर फाऊंडेशनतर्फे आर्थिक मदत दिल्या गेलेल्या आणखीही प्रयोगशाळा कणाद प्रयोगशाळा या नावाने उभ्या राहिल्या.
वेश्यांच्या मुलामुलींसाठीच्या वसतिगृहाकरीता दिलेल्या रुपये एक लाखाच्या देणगीतून उभा राहिलेला निवारा. 'निहार' पुणे.
दर्जेदार आणि कलात्मक चित्रपटांची आवड निर्माण करणाऱ्या 'आशय फिल्म क्लब' या संस्थेला स्वत:चे प्रोजेक्टर्स विकत घेण्यासाठी फाउंडेशनने देणगी दिली.

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित