|
|
शब्द स्वरांत रममाण होत दुसऱ्यांना सदैव आनंदी ठेवणारे
पु. ल. आणि सुनीताबाई यांनी जीवनभर जपलेली सामजिक जाणीव
त्यांच्या जीवनाला कृतार्थ करणारी ठरली. बाबा आमटे यांचे
आनंदवन हे या दांपत्याच्या जीवनातील आनंद निधान बनून गेले.
सहजपणे कोणत्याही प्रकारचा आव न आणता प्रेमानं पुलंनी आनंदवनात
रममाण व्हायचं ठरवलं ही गोष्ट तिथल्या रहिवाशांच्याही दृष्टीनं
केवळ अपूर्व आणि आनंददायी ठरली पण पु. ल. आणि सुनीताबाई
यांची ही सामाजिक जाणीव एवढ्यापुरतीच सीमित राहिली नाही.
आपल्या कार्यकर्तृत्वातून उभे राहिलेले धन समाजातील चांगल्या
उपक्रमांना प्रोत्साहनात्मक ठरावे या त्यांच्या इच्छेतून
पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान अस्तित्वात आले आणि त्यातून
अनेक विधायक उपक्रम निर्माण झाले, विकास पावले. आर्थिक ओढग्रस्तीच्या
काळात जी. पी. नाईक यांच्या गारगोटीच्या मौनी विद्यापीठाला
शंभर रुपयांची मदत देणाऱ्या पु.लं.नी पुढे संगमनेर मधील
ग्रामीण विद्यापीठाला बारा लाख रुपयांची देणगी देऊन एक नवाच
आदर्श निर्माण केला. वाई, उत्तूर मधील शाळा असो, की पार्ल्याचा
लोकमान्य सेवा संघा असो, मराठवाडा साहित्य परिषद असो, की
अनिल-अनिता अवचटांचं मुक्तांगण व्यसनमुक्तीकेंद्र असो, पु.लं.नी
हात भरभरून भरघोस दान दिले. पण त्याचा कुठे गवगवा होऊ दिला
नाही. कि जाहिर वाच्यताही केली नाही. १९६५ पासून सुमारे
७५ लक्ष रुपयांच्या देणग्या प्रतिष्ठानाने दिल्या. आणि त्यातून
मुंबईची के. ई. एम. रक्त पेढी, पुण्याचं के. ई. एम. रुग्णालय,
पुणे मराठी ग्रंथालय, देवदासींसाठी काम करणारी बेळगाव तालुक्यातील
उत्थान संस्था, मिरज विद्यार्थी संघ, ग्रामायान, मराठी विज्ञान
परिषद, फर्गसन मधील किमया , पुणे विद्यापीठ अशा कितीतरी
संस्थांमध्ये नवे नवे प्रयोग घडले. या संस्था चैतन्यादायी
झाल्या. त्याचं खरं श्रेयं पु.लं.नांच द्यायला हवं! पु.
ल. मात्र हे श्रेय आवर्जून सुनीताबाईंना देत असत. |
|
|
|
|