|
... पु. लं. बरोबर होणाऱ्या गप्पांमध्ये वाढत्या बुवाबाजीचा आणि
अंधश्रद्धांचा विषय असे. भ्रष्टाचाराबद्दल आणि सत्तेच्या माजाबद्दल
त्यांना चीड होती. जातीय दंगलीच्या बातमीने ते कमालीचे व्यथित
होत. पण कोणी चांगलं काम करतोय असं सांगितलं की ते त्यांना ऐकायला
आवडे. ते एकदा म्हणाले, 'या वयात काही चांगलं ऐकलं ना, की डोळ्यांत
पाणी येतं.' एखाद्या दिवशी बोलावणं येई. मला विचारीत, "चांगली
संस्था किंवा व्यक्ति सांग. आम्हाला मदत करायची इच्छा आहे."
मी कधीतरी एखाद्या कामविषयी बोलून गेलो असलो, तर त्याची आठवण ठेवून
विचारत, 'तू ते मागे म्हणाला होतास की एक मेहेतर समाजात बालवाडी
चालवणारी मुलगी आहे. त्यांच्या कामाला मदत करायचीय.' एखाद्या वेळेस
काही विषयामधला माणूस शोधत. "अरे, या वेळी मुस्लीम समाजात
सुधारणेचं काम करणाऱ्याला आम्हाला काही द्यायचंय." मग मी
अमरावतीच्या मुस्लीम समाजात संततिनियमनाचं काम धाडसानं करणाऱ्या
वझीर पटेलची माहिती सांगितली. वझीरला बोलवून घेतलं. तो पु.लं.कडे
जायचं म्हटल्यावर केवढा हरखून गेला होता! या सर्व कार्यकर्त्यांना
अनपेक्षितपणे पैसे तर मिळतच; पण त्याहून पु.लं.नी आपल्या कामाची
कदर केली याचं प्रचंड अप्रूप वाटे. पु. लं.ची देणगी मिळाली म्हणून
त्यांच्या परिसरात त्यांचं वजन वाढे. सुनीताबाई एखाद्या कामाची
काटेकोर तपासणी करीत. मदत करण्यासाठी त्यांच्या पसंतीच्या कामाची
निवड होत असे. मला त्यांनी सांगून ठेवलं होतं, की या कार्यकर्त्यांनी
या देणगीचा कुठे उल्लेख करायला नको. सुनंदा त्या वेळी 'जीवन ज्योत'
मतिमंद मुलांच्या शाळेच्या उपक्रमात भाग घ्यायची. त्याची आठवण
ठेवून त्याही संस्थेला देणगी दिली. एकदा त्यांच्या सांगण्यावरुन
मी एका कार्यकर्त्याला घेऊन गेलो. आधीच सुनीताबाईंनी मला कल्पना
दिली होती, 'पाच ते दहा हजारापर्यंत देणगी देऊ' त्याला घेऊन गेलो.
त्याला दोघांनी खूप प्रश्न विचारले. चेक लिहिला. पु.लं.ची सही
घेतली आणि खाली येऊन आकडा पाहिला, तर पंचाहत्तर हजार. त्या मुलाचे
पाय थरथर कापू लागले.
'पु. ल. देशपांडे फाऊंडेशन' हा ट्रस्ट त्यांनी केला होता. त्यांच्या
पुस्तकांची, कॅसेट्सची, नाटकांची रॉयल्टी परस्पर त्यात जमा होत
असे. पुण्यात त्यांचा एक छोट प्लॉट होता. तो विकून त्याचेही
पैसे ट्रस्टमध्येच जमा केले. त्यावेळेपर्यंत चाळीस लाखावर त्यांनी
त्या ट्रस्टमधून देणग्या दिल्या होत्या. त्यात कोकणातली एखादी
शाळा असे, विलास वाघांची वेश्यांच्या मुलांची संस्था असे...
अशी तऱ्हेतऱ्हेची विविधता त्यात असे. माझ्यासारख्या अनेकांना
विचारुन ते अशा योग्य कामांचा शोध घेत.
... ८६ साली आमच्या जीवनातलं मुक्तांगणपर्व सुरु झालं. आजवर
देणगी देण्यापूर्वी मला विचारायचे; आता आम्हालाच देणगी मिळण्याचा
योग आला. आमच्या मित्राचाच मुलगा गर्दचा व्यसनी झाला. त्याला
सुनंदाने घरीच ट्रीट केलं. त्यानंतर त्याविषयीची माहिती घेऊन
मी 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये लेखमाला लिहिली. ती वाचून काही
व्यसनी मुलांचे पालक आमच्याकडे येऊ लागले. ससूनमध्ये पाठवावं,
तर तिकडूनही नकार आला. मी हे प्रकाशक मित्र मधुकाका कुलकर्णींना
सांगितलं, 'तुम्ही या मुलांसाठी काही तरी करा. आम्ही तुम्हाला
एक लाख रुपये देणगी देणार आहोत.' मला काय करावं हा प्रश्न पडला.
आमचा ट्रस्ट तोपर्यंत स्थापन झालेला नव्हता. सुनीताबाई म्हणाल्या,
'ठीक आहे. पुढची सोय होईपर्यंत सेवकांचे पगार पु. ल. देशपांडे
फाउंडेशन तर्फे करु.'
मला आश्चर्यच वाटलं. या संस्थेच्या बाबतीत त्यांनी अनेक अपवाद
केलेले होते. ते चालू असलेल्या संस्थेस नेमक्या अडचणीसाठी मदत
करीत. पण इथं संस्थाही स्थापन झालेली नव्हती आणि कार्य तर सुरुच
व्हायचं होतं. दुसरं म्हणजे ते एकदा देणगी दिल्यानंतर त्या संस्थेच्या
कुठल्याही व्यवहाराशी संबंध ठेवत नसत. इथं तर त्यांनी हा उपक्रम
त्यांच्या फाउंडेशन तर्फे- पुढची सोय होईस्तोवर- चालवायला घेतला.
स्थापनेचा कार्यक्रम ठरला. डॉ. ह. वि. सरदेसाईंच्या हस्ते उद्घाटन
ठरले. बाबा आमटे त्यावेळी पुण्यात होते. ते आपण होऊन आले, ही
पु. लं. ची सदिच्छा कमाई.
आम्ही व्यसानातून बऱ्या झालेल्या दहा-बार तरुणांनाच कामावर
घेतले. सगळ्यांचे पगाराचे चेक सुनीताबाई दर महिन्याला लिहून
ठेवत. त्यांची आणि पु. लं.ची त्यावर सही असे. पहिला चेक मिळाला,
तेव्हा व्यसनातून नुकताच बरा झालेला प्रसाद चांदेकर म्हणाला,
'मी हा चेक वटवणारच नाही; कारण त्यावर पु. लं.ची सही आहे.' मी
हे पु. लं.ना सांगताच ते म्हणाले, 'अरे त्याला सांग, असं नको
करु, चेक भर. मी हवं तर कागदावर सही करुन देतो.' त्यांनी पाठवलेली
सही मिळाली, तेव्हा प्रसादने चेक भरला. मुक्तांगणने एक वर्ष
पुरं केलं, तेव्हा(२७ ऑगस्ट ८७ ला) कार्यक्रम केला. त्याला पु.
ल., सुनीताबाई दोघंही होते. सभेत बोलतांना म्हणाले, 'व्यसनी
लोकांना हवी असते ती ओंजळभर माया. समाजाने ती माया दिली, तर
लोक व्यसनांकडे वळतील कशाला?' पुण्यातल्या एका गणेश मंडळाने
लक्ष दिवे जाळण्याचा उपक्रम केला होता. त्याला संबोधून म्हणाले,
'लक्ष दिव्यांसाठी तेल जाळण्यापेक्षा एका व्यसनग्रस्ताच्या जीवनात
प्रकाश आणला तर किती बरं होईल!'
... अपूर्ण
- श्री. अनिल अवचट
('पु. ल. नावाचे गारुड')
|