आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
puladeshpande.net एक प्रवास

दि. १२ जून २०१०
पु. लं. शी माझी पहिली ओळख हि त्यांच्या लेखनातून आणि त्यांच्या पेटीवादनातून झाली. शालेय वयात त्यांच्या कथाकथनाच्या कॅसेटस ऐकतांना गंमत वाटे. आईबाबांबरोबर बसून त्यांचे पेटीवादन ऐकताना एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटत असे. पुढे कॉलेमधल्या वयात त्या विनोदातला उपरोध लक्षात येऊ लागला. लहान वयात विनोदी लेखक म्हणून पु. लं. ची झालेली ओळख किती वरवरची होती हे मला जाणवले, ते सर्वात प्रथम त्यांच्या 'हे जग मी सुंदर करुन जाईन..' या लेखातून !.. मंडळी, हा अनुभव थोड्याफार फरकानी तुम्ही प्रत्येकानेच घेतला असणार. त्यामुळे पु. लं. चं साहित्य, त्यांचा खट्याळ पण उपरोधिक विनोद, कलेची आणि सच्च्या कलावंताची अचूक जाण, सामाजिक भान आणि त्याहीपलिकडे माणसातले माणूसपण जपण्याची धडपड... या पुढे आणखी पु. लं. च्या व्यक्तिमत्वातली वैशिष्ट्ये सांगण्याचे सामर्थ्य माझ्या लेखणीत (किंवा किबोर्ड मध्ये :-p) नाही. अर्थात आजचा हा लेखनप्रपंच फक्त पु. ल. किती मोठे होते हे सांगण्यासाठी नाही तर त्यांचे मोठेपण आणि त्यांची लोकप्रियता याचा जो प्रत्यय गेल्या १० वर्षात puladeshpande.net च्या माध्यमातून मला आला आणि आजही येतो आहे त्याविषयी आहे.

Globalmarathi.com च्या माध्यमातून हा अनुभव मी तुमच्याशी 'share' करणार आहे. मंडळी, 'share' अश्यासाठी कि छोट्या- मोठ्या प्रसंगातली गंमत- एखाद्या प्रसन्न वेळी ऐकलेला प्रसन्न यमन, झाडावर नुकतीच उमलेली कळी हे असे प्रसंग 'share' करायची सवय मला आजोबांनीच (म्हणजे पु. ल. आजोबांनी बरं का !) लावली. आता पु. ल. माझे आजोबा (virtual आजोबा म्हणा हवं तर) कसे झाले याचा किस्सा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, - तर असा हा puladeshpande.net चा १० वर्षांचा प्रवास मी तुमच्याशी 'share' करणार आहे. (आज पु. ल. असते, तर त्यांना आताच्या पिढीचा 'share' करणे हा शब्द नक्कीच आवडला असता). तसं पाहिलं, तर खरा कलावंत हा त्याला मिळालेली अनुभूती फक्त त्याच्यापाशी न ठेवता, त्याच्या कलाकृतीतून रसिकांशी 'share' च करत असतो. हे 'share' करणे आपण कसे 'enjoy' करतो, यावर आपण त्यातून कमी-जास्त प्रमाणात आनंद मिळवत असतो. त्यामुळेच 'share' करणे आणि 'share' केलेले 'enjoy' करणे हे आमच्या पिढीचे आजचे शब्द पु.लं. ना नक्कीच आवडले असते, असं मला नेहमीच वाटतं ! असो !

आजच्या १२ जूनच्या दिवशी मला २००१ सालचा १२ जून आठवतो. पु. लं. च्या प्रथम स्मृतीदिनाच्या दिवशी puladeshpande.net च्या माध्यमातून मी त्यांना वाहिलेली आदरांजली ! याची सुरुवात झाली एप्रिल २००१ मध्ये. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची परिक्षा झाली होती. वाचन, मनसोक्त गाणं ऐकणे हा उद्योग आणि internet हे एक नवीन मिळालेले खेळणे ! कॉलेजच्याच वयात मला माझ्या एका मित्राच्या संग्रहातले पु. लं. चे खूप वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचायला मिळाले. जे त्यावेळी इतर पुस्तकात प्रकाशित झाले नव्हते. ७०-८० च्या दशकातील कालनिर्णय, मनोहर इ. सारख्या मासिकात प्रकाशित झालेले, पु. लं. च्या साठीच्या वेळी निरनिराळ्या वर्तमान पत्रातून छापून आलेले लेख, काही पु. लं. नी लिहिलेले, तर काही पु. लं. वर इतरांनी लिहिलेले. नुकतीच झालेली इंटरनेट ची ओळख आणि त्या विषयीच्या काही तांत्रिक गोष्टी हा माझ्या त्यावेळच्या अभ्यासक्रमाचाच भाग असल्यामुळे वेबसाईट चे हे माध्यम मला माझ्याजवळ असलेल्या संग्रहातील गोष्टी share करण्यासाठी सगळ्यात जवळचे वाटले. पु. ल. गेल्यानंतर लगेचच म्हणजे जून २००० मध्येच पहिल्यांदा ही कल्पना माझ्या मनात आली. पहिली अडचण होती मराठी font ची. dynamic font हा प्रकार अगदीच नवीन ! त्या भानगडीत न पडता सगळीच pages, image format मध्ये convert करुन कामाला सुरुवात केली. अगदी निवडक आणि काही जुन्या लेखांचा संग्रह करुन त्याचे वर्गीकरण करताना, पु. लं. च्या वेगवेगळ्या पैलूंची नावे त्याला दिली. अर्थातच हे सगळे पैलू पु. ल. प्रेमींसाठी नवीन नव्हते, पण त्यावेळच्या आमच्या पिढीला कितीतरी गोष्टी नवीन होत्या. पु. लं. चे वैचारिक लेख अनेक जण पहिल्यांदाच वाचत होते. रेडिओ साठी पु. लं. नी किती आणि काय काय काम केले, दूरदर्शनच्या उभारणीत त्यांचा असलेला वाटा ही सगळी माहिती मला आणि माझ्याच वयाच्या website च्या प्रत्येक वाचकाला नवीन आणि interesting होती !. आणि हे सगळे मराठीतून वाचता येणार होते, हे विशेष ! पण त्यावेळी सुरुवातीला केलेली webpages publish करायचे कामही माझ्यासाठी तितकेसे सोपे नव्हते.

कॉलेज संपून सुटी सुरु झाल्यामुळे आम्ही घरातील सगळेजण बाहेरगावी फिरायला जाणार होतो. १२ जून पर्यंत आम्ही परत येणार नव्हतो. आणि मला पु. लं. च्या पहिल्या स्मृतीदिनाच्या दिवशीच site live करायची होती. एप्रिलमध्येच मग जोरदार तयारी सुरु केली. बाहेरगावी निघायच्या दोन दिवस अगोदरच सगळे काम पूर्ण झाले, आणि माझ्या PC चा monitor बंद पडला. मी चक्क दोन दिवसांकरता एक monitor भाड्यानी आणला! खरंतर आजही एखादी नवीन site live झाल्यानंतर ती पहिल्यांदा बघताना, सुरुवातीचे काही दिवस hits, visits, statistics monitor करतांना मला एखाद्या लहान मुलासारखाच आनंद होतो, मग त्यावेळी तर ते सगळं अगदीच thrilling असं होतं ! मंडळी, कल्पना करा, ही १० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा आपल्याकडे भारतात dial up internet होतं. मी हे सगळे उद्योग MTNL चे dial up connection वापरून सुरुवातीला केले :-D हे dial up कधी कधी खूपच slow होऊन जायचं. मग सगळं काम १५-२० floppies मध्ये copy करायचं आणि cyber cafe मध्ये जाऊन upload करायचं, हे माझं व्यसनच झालं. त्या floppies carry करणं म्हणजे कसरतच. (आता हजारो GB data आपण सहज जवळ बाळगतो ! ). त्यावेळी असे तासन‍ तास dial up internet वापरणे, monitor बंद पडल्या पडल्या भाड्यानी आणणे आणि वेळ पडली तर cyber cafe मध्ये अनेक तास files upload करत बसणे असं सगळं मी झपाटल्यासारखं करत होते, कारण त्या वयात ते सगळं नवीन आणि त्यामुळेच exciting होतं. त्यात great असं काहीच नाही पण हे सगळं करु देणारे माझे आई-बाबा पण great च म्हटले पाहिजेत ! अर्थात आमच्या पिढीपर्यंत आम्ही काय करतो हे आमच्या आईबाबांना माहित असायचं. आज सारखं मुलं games, वडिल online surfing आणि आई T.V. Serials मध्ये बिझी त्यामुळे कोणाचंच कोणाला काही माहित नाही असं नव्हतं - तर असो.

एका free server वर त्यावेळी सगळी pages upload करुन website live झाली. त्यावेळी 'मायबोली' हे एकमेव मराठी 'discussion forum' होतं. तिथे मी upload केलेल्या pages ची link post केली. दुसऱयाच दिवसापासून अभिप्रायांच्या असंख्य ई-मेल्स नी माझा मेल बॉक्स भरू लागला. निरनिराळ्या वयोगटातल्या, क्षेत्रातल्या पु. ल. प्रेमींचा असा भरघोस प्रतिसाद पहिल्या दिवसापासून येत होता. केवळ आपल्या कलाकृतींतून एखादी व्यक्ती समाजातल्या सर्वच थरातल्या- सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वच व्यक्तींच्या जीवनात किती खोलवर प्रभाव पाडू शकते याचा प्रत्यय मला अनेक अनुभवातून येऊ लागला. ई-मेल्स, गेस्ट बुक च्या माध्यमातून पु. लं. विषयी पु. ल. प्रेमी भरभरून लिहित होतेच, पण भारावून गेलेले कितीतरी परदेशात असतानाही माझा फोन नंबर शोधून फोन करत असत. निराशेच्या, दु:खाच्या क्षणी पु. लं. चे साहित्य हे अनेकांचे टॉनिक होते ! पहिल्या काही महिन्यांनंतर bandwidth संपल्यामुळे साईट बंद झाल्याचा अनुभव आला, तेव्हा मी खूपच निराश झाले. (पुन्हा एकदा-- १० वर्षांपूर्वी हे resources सहज उपलब्ध नव्हते आणि मला त्याचा अनुभवही नव्हता.) केवळ माझे काम बंद पडू नये म्हणून एका पु. ल. प्रेमीने (जो मला नीट ओळखतही नव्हता) additional bandwidth चे पैसे भरून एका रात्रीत साईट पुन्हा सुरु करुनही दिली ! असे अनेक अनुभव मला येऊ लागले.

महाराष्ट्राचे हे लाडके व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे खरोखरच किती 'लाडके' होते याचा प्रत्यय मला puladeshpande.net च्या माध्यमातून आला आणि अजूनही येतो आहे. अश्या अनुभवाच्या आणि आठवणींच्या श्रीमंतीची तुलना करायची तरी कशाशी ?

ही गोष्ट तुमच्या माझ्यासारख्या वाचक-रसिकांची, तर ज्यांचे आयुष्य पु. लं. मुळे घडले, ज्यांच्या जडणघडणीत पु. लं. च्या शिकवणुकीचा, संस्कारांचा आणि सहवासाचा मोठा वाटा होता, त्या सगळ्यांचेच व्यक्तित्व पु. लं. च्या सहवासाच्या परिसस्पर्शाने उजळले नाही तरच नवल ! सगळ्याच आठवणी आत्ता सांगणे शक्य नाही, फक्त एक उदाहरण म्हणजे- मधू कदम- 'वराती'तला रामा गडी- ज्यांना पु. ल. 'झांजेतला थिरकवॉ म्हणत ! थिरकवॉंसारख्या थोर तबलावादकाच्या वादनातली लय पु. लं. ना मधू काकांच्या झांजेत दिसली. 'वरातीची' सीडी ऐकताना / पाहताना मधू काकांच्या झांजेला दाद द्यावी कि पुलंच्या कलासक्त दृष्टीला? आज ७५ व्या वर्षी सुद्धा 'वाऱ्यावरची वरात' मधू काकांना संपूर्ण पाठ आहे. त्यातल्या प्रत्येक पात्राच्या लकबींसह कित्येक प्रसंग त्यांच्याकडून ऐकण्याचं / पाहण्याचं भाग्य मला लाभलं. ते नेहमी सांगतात आम्हाला सगळ्याच कलाकारांना सगळं नाटक पाठ असे. भाई बसवतानाच इतकं सहज बसवत की वेगळ्या पाठांतराची गरजच नसे. 'माझं आयुष्य भाईंनी घडवलं' असा उल्लेख मधू काकांच्या बोलण्यात आजही येतो.

असं सगळं मजेत सुरु असताना, कुठल्यातरी ८ नोव्हें. च्या दिवशी सुनीताबाईंशी बोलायचा विचार माझ्या मनात आला, आणि मी त्यांना फोन केला ! माझी ओळख सांगितली आणि मी वेबसाईट केल्याचंही सांगून टाकलं ! सुनीताबाईच त्या !! इंटरनेट आणि वेबसाईट ही कधीही न ऐकलेली नावं, मग सगळं अगदी व्यवस्थित समजून घेतल्या शिवाय माझी सुटका कशी होणार ? मी कसंतरी समजवायचा प्रयत्न केला. त्या थोडं हसल्या... मला विचारलं,
“तुझं वय काय ?”
“२० – २१ वर्ष..” मी गोंधळात पडून असंच काहितरी म्हटल्यासारखं आठवतंय.
“तुला माहित्येय का? तुझी आई सुद्धा माझ्याहून कितीतरी लहान असणार. तू तर माझ्या नातीच्याच वयाचीयेस ! आत्ता हे करायचं वय नाही बाळा तुझं.”
परत थोडं थांबून हसल्या.
“खरंतर मी legal action सुद्धा घेऊ शकते यावर".
(यांना बहुतेक मी जे केलंय ते अगदीच लहान वयात एरवी मोठ्ठ्या माणसांच्या वयात जे करतात असं काहीतरी करुन आगाऊपणा केलाय असा समज झाला की काय ? की घाबरुन मी माझं वय १०-१२ सांगितलं ? एकदम Legal action वगैरे ? )
“पण कशासाठी ? मी स्वत:हून सांगत्येय ना !” - मी थोडा धीर करुन म्हटलं.
“मग आधी सांगावंसं का नाही वाटलं?” - एकदम instant प्रश्न
“मला माहित नव्हतं हो, ते आधी सांगायचं असतं ते ! ”-
(माझा स्वर आता थोडा रडवेला झाला)
“असं कसं माहित नव्हतं ? झाड काही उगाच वाढतं का? त्याला आपणच खत पाणी घातलं कि मगच वाढतं नाही का?”
(पण झाडाचा इथे काय संबंध ? असं माझ्या मनात आलं- पण मी नाही विचारलं. ) त्यानंतरची १५-२० मिनीटं त्या बरंच काही सांगत होत्या. पण मला ते काहीच आठवत नाही ! कारण एकीकडे माझं रडू सुरु होतं :-D
तेव्हापासून माझ्या भावा बहिणींमध्ये पु. ल. माझे आजोबा आणि सुनीताबाई आजी झाल्या - हे सांगायला नकोच.

पुढे गानू काकांबरोबर (मधू गानू) मला सुनीताबाईंना २-३ वेळा भेटता आले, आणि अनेक आठवणीही ऐकता आल्या. मी एकदा त्यांना पु. लं. चा फोटो आणि खाली बोरकरांची एक कविता असं एकत्र printout काढून भेट म्हणून दिलं. त्या पटकन म्हणाल्या, तुला माहितीये कोणाची कविता? मी म्हटलं हो- बोरकर. पण सगळ्यांनाच माहिती असेल का? खाली कवीचं नाव घातलं पाहिजे. नाही तर कोणाला तरी वाटू शकतं ना, भाईचीच कविता आहे ( !.. ) मंडळी, आज इंटरनेटचा पसारा इतका अफाट वाढलाय की कॉपीराईट, पायरसी, एखाद्याच्या कलाकृतीचे हक्क, या गोष्टींचं महत्व आता जाणवतं. पण फक्त पु. लं. च्याच नाही तर कुठल्याही कलाकाराच्या कलाकृतींचा हक्क त्यालाच मिळाला पहिजे, आणि त्याचा गैरवापरही होता कामा नये, याबद्दल सुनीताबाई किती जागरूक असत याचाच प्रत्यय मला आला.

हा सगळा इतिहास एका लेखात संपणं शक्य नाही.
अजून खूप लिहावंसं वाटतंय ...
... क्रमश:


- स्मिता मनोहर.

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित