आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
सामाजिक जाणीव
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे...
जयवंत दळवी
अनिल अवचट
... पु.लं.च्या आणि मराठी रसिकांच्या सुदैवाने पु. लं. चे एकपात्री किंवा बहुरुपी कार्यक्रम अतोनात यशस्वी झाले. बटाट्याची चाळ, असा मी असामी, वाऱ्यावरची वरात, वटवट हे सर्व कार्यक्रम खूप गाजले. चाळीने तर लोकांना अक्षरश: वेड लावले. या कार्यक्रमातून आणि लेखनातून पु. लं. ना कोणत्याही हिशोबाने बऱ्यापैकी पैसा मिळाला. कोणीही हा पैसा उधळला असता, चैन केली असती किंवा पुढील आयुष्याची तरतूद म्हणून जपून ठेवला असता. परंतु पु. लं.नी या पैकी काहिही केले नाही. त्यांनी मिळालेल्या बहुतेक पैशाचा ट्रस्ट करुन तो पैसा सार्वजनिक सेवा कार्याला दिला. अनाथ विद्यार्थी गृह, अंध शाळा, बाबा आमटे यांचा कुष्ठाश्रम, रुग्णालय, रक्तपेढी अशा कितीतरी संस्थांना आणि कार्याना त्यांनी काही लाख रुपये दिले. प्रस्तुत पुस्तकही विक्रीला येण्याआधीच त्या पुस्तकाचे काही हजार रुपयांचे मानधन स्वत: न घेता ते पूर्णपणे सार्वजनिक संस्थेला देण्याचे त्यांनी निश्चित केले आहे.

पु. लं. च्या व्यक्तिमत्वातला सामाजिक दानतीचा हा भाग मला अत्यंत दुर्मिळ आणि म्हणूनच खूप विलोभनीय वाटतो. अधिक पैसा... अधिक पैसा असा ध्यास-हव्यास धरुन पैशासाठी आपण काय काय करतो. खोटे-नाटे मार्ग सुद्धा आपण अनुसरतो. आणि आपल्यातलाच हा एक साधा मध्यमवर्गीय माणूस आपल्या कलेतून कमावलेला पैसा परत लोकांना देऊन टाकतो- लोकांचे जीवन थोडे अधिक सुखी व्हावे म्हणून! सामाजिक बांधिलकीचा हा गुण मला पूजनीय वाटतो. हा गुण आपल्याला आत्मसात करता यावा असे वाटू लागते. आणि हे सारे देतांना किंवा दिल्यानंतर ते एका शब्दाने त्याची कधी मचमच करीत नाहीत. मी इतक्या वेळा त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत, परंतु एखाद्या संस्थेला मी इतके साहाय्य दिले असे कधी त्यांच्या तोंडून मी ऐकलेले नाही. एखादा मध्यम वर्गातला माणूस जसा राहिल तेवढ्या राहणीला आवश्यक तेवढी त्यांची मासिक प्राप्ती आहे. तेवढे व्याज सुटेल एवढी तरतूद त्यांनी केली आहे. चैन त्यांना सहज शक्य होती आणि आहेही! पण त्यांच्याच नव्हे, तर सुनीताबाईंच्याही वृत्तीत एक प्रकारचे खरेखुरे वैराग्य आहे. रेशनमध्ये घाणेरडा तांदूळ मिळत असे आणि बाहेर काळ्या बाजारात उत्तम तांदूळ मिळत होता तेव्हासुद्धा सुनीताबाई रांगेत उभ्या राहून रेशनचाच तांदूळ खात होत्या- काळ्या बाजारातला तांदूळ परवडण्यासारखा होता तरीही! पु.लं.चा पोशाख सुद्धा काय असतो? खादीचा पायजमा आणि हातमागाच्या जाड कापडाचा ढगळ सदरा! पं. वसंतराव देशपांडे तर विनोदाने पु.लं.चे कपडे शिंप्याने शिवल्यासारखे वाटत नाहीत असे म्हणत असतात.

... जे जे काही नवीन दिसेल, जे जे समाजाला उपकारक आहे असे वाटेल त्यात पु. ल. उत्साहानेच नव्हे, तर अति उत्साहाने उडी घेणार हे ठरलेलेच असते. विनोबांचे भूदानकार्य म्हणा, किंवा हल्ली बाबा आमटे यांचे कुष्ठाश्रमाचे कार्य म्हणा, त्यात पु. ल. अक्षरश: बुडून जातात. पण उत्साहाने उड्या घेताना उत्साहाच्या भरातसुद्धा त्यांचा मूल्यविवेक कधी सुटलेला नाही. उदाहरणार्थ, सत्यसाईबाबा किंवा आचार्य रजनीश यांचे पूर आले म्हणून तेथे पु.लं.नी कधी उडी घेतलेली नाही. उलट, अशा लोकांची त्यांनी सदैव रेवडीच उडवली आहे!

पु.लं.ची दुसरी एक गोष्ट मला मोठी महत्वाची आणि अनुकरणीय वाटते. चित्रपटसृष्टीत म्हणा किंवा बेळगावच्या कॉलेजात म्हणा काही साधण्यासाठी त्यांनी काही तडजोडी केल्या नाहीत, किंवा लाचारी पत्करली नाही. मालेगाव प्रकरण हे त्यांच्याच नव्हे, तर सुनीताबाईंच्याही नेकीचे एक उत्तम उदाहरण आहे. भाऊसाहेब हिरे यांनी मंत्रीपदावर असताना आपल्या मालेगावी महात्मा गांधी विद्यामंदिर काढले. तेथे प्रमुख म्हणून त्यांनी पु.लं.ना नेले. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून आणि वसतिगृहाच्या प्रमुख म्हणून सुनीताबाईंना नेले. या विद्यामंदिरामागे जी ध्येयवादी कल्पना होती तिचे या दोघांना आकर्षण वाटले. पु.लं.ना पूर्वीपासून शांतिनिकेतनचे वेड होते. त्या धर्तीवर महात्मा गांधी विद्यामंदिर चालवावे; विद्या, निसर्ग, जीवन एकमेकात गोवून शेतकऱ्यांच्या मुलांना जीवोन्मुख करावे या उच्च ध्येयाने प्रेरित होऊन पु. ल. आणि सुनीताबाई मालेगावला गेले. सुनीताबाई या ठाकूर असतांना त्या राष्ट्रीय चळवळीशी, राष्ट्रसेवादलाशी, समाजवादी विचाराशी निगडित होत्या. त्यामुळे दोघांनाही मालेगावी नवीन क्षितिजे दिसली. त्या काळी भाऊसाहेब हिरे हे राजकारण आणि सत्ताकारण यांतले मोठे प्रस्थ होते. त्यांच्याशी जुळवून घेतले असते तर खूप काही करता आले असते. परंतु त्या संस्थेच्या एकूण व्यवहाराबद्दल शंका निर्माण होताच पु. ल. आणि सुनीताबाई यांनी काही दिवसांतच राजीनामा देऊन मालेगाव सोडले. नुसतेच काही साधायचे असते, तर त्यांना या व्यवहाराकडे कानाडोळा करता आला असता! पण पु. ल. अशा गोष्टींपासून नेहमीच अलिप्त राहिले आहेत...

... अपूर्ण
- श्री. जयवंत दळवी
('साठवण' च्या प्रस्तावनेतून)

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित