आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
पु.लं.ची श्रद्धास्थाने
बालगंधर्व
टागोर
शेक्सपिअर
... एकदा बंगाली समजायला लागल्यावर माझी अवस्था नवी कुऱ्हाड गवसलेल्या, त्या लहानपणीच्या शाळेतल्या धड्यातल्या छोट्या जॉर्ज वॉशिंग्टनसारखी झाली. 'अहो मला वाचता येतंय्' म्हणणाऱ्या दिवाकरांच्या अविस्मरणीय नाट्यछटेतल्या मुलासारखे जे दिसेल ते वाचत सुटायचा मी सपाटा लावला. रवीन्द्रनाथांची ग्रंथरचना पाहून तर छातीच दबली. त्यांची साहित्यिनिर्मिती इतकी विविध आणि विपुल की एवढे लिहायला त्यांना सवड तरी कधी मिळाली हे कळले नाही. जिथे रवी पोहचत नाही तिथे कवी पोहोचतो म्हणतात. पण ही म्हण प्रत्यक्षात खरी करुन दाखवणारे रवीन्द्रनाथ हे एकच कवी असावेत! महाभारतापासून मलेरिया निर्मूलनापर्यन्त असंख्य विषयांवर त्यांनी लिहिले. जवळजवळ तीन हजार गीते स्वरलिपीसह बंगालला दिली. नाटके, कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, निबंध. नुसती पत्रे लिहिली ती देखील हजारोंच्या संख्येने! नृत्य, नाटके बसवली. त्यांत भूमिका केल्या, गायले. एवढ्याने भागले नाही म्हणून शेकड्यांनी चित्रे काढली. विश्वभारतीसारखी 'वन्-मॅन्-युनेस्को' उभी केली. ग्रामोद्योग, शेती, हॅण्डीक्राफ्टस्, वैद्यकी, राष्ट्रीय आंदोलनात भाषणे, नव्या नव्या इमारती बांधणे आणि सतत पायाला चक्र लावल्यासारखा जगभर प्रवास. इंग्रज, फ़्रेन्च, पोर्तुगीज, स्पॅनिश, डच यांच्यासारख्या साम्राज्यवादी युरोपिअनांच्या आधिपत्याखाली गुलामांचे जिणे जगलेल्या, स्वत्व हरवलेल्या भारतालाच नव्हे तर साऱ्या आशिया खंडाला त्याचा हरवलेला 'आत्मा' शोधून दिला. बंगालला तर टागोरांनी नवी बंगाली भाषाच दिली. कृत्रिमतेच्या बंधनात अडकलेल्या साधु किंवा पंडिती भाषेचे 'चलित' स्वरुपात रुपांतर करुन तिच्यात नवे चैतन्य आणले. टागोरांची थोरवी नव्याने सांगायला हवी असे नसले तरी त्यांच्या प्रतिभेची उंची आणि व्याप्ती बंगाली भाषेशी परिचय झाल्याखेरीज लक्षात येत नाही. शिवाय त्यांचे ते भव्य आणि सुंदर दर्शन, गायन-नृत्य-नाटक यांच्याशी असलेले साहचर्य यामुळे ह्मा माणसाच्या आयुष्यात त्याला विपरीत परिस्थितीशी झगडावे लागले असेल, बंडे करावी लागली असतील याची कल्पनाही पुष्कळांना येत नाही. परकीय आणि स्वकीय दोघांच्याही विरोधाला तोंड देत त्यांनी मार्ग काढला आहे.

रवीन्द्रांच्या नाटकांशी आणि काही कवितांशी माझी भाषांतरातून ओळख होती. पण त्यांचे हे नाना विषयांवरचे लेख वाचताना कॉलिडोस्कोपमधून हजारो रंगावृत्ती पाहिल्यासारखे वाटत होते. वयाची पंचाहत्तरी उलटली तरी लेखनात खंड पडला नव्हता. 'नित्य नवा दिवस जागृतीचा'. अखेरच्या दिवसापर्यंत जगाकडे लहान मुलाच्या कुतुहलाने आणि जिज्ञासेने पाहणारा हा महामानव. जीवनाकडून घेण्याची आणि घेतलेले ज्ञान समाजपुरुषाला सव्याज परत फेडण्याची इतकी धडपड आधुनिक भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातदेखील कुठल्या महापुरुषाच्या जीवनात आढळेल की नाही कोण जाणे! आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेली नाटके पुन्हा परिष्कृत करुन, सुधारुन, बदलून अधिकाधिक चांगली करण्याची त्यांची जिद्द लोकविलक्षण. त्यांना म्हणे चार-पाच तासांची झोप पुरत असे. झोपेवर प्रेम नसणारा हा एकमेव महान् बंगाली अपवाद! कधी कधी अठरा तास लेखन करीत. वृद्धापकाळात तर ह्या श्रमांमुळे त्यांना मूर्छाही येई असे म्हणतात. पण थांबून रहाणे हे त्यांना ठाऊकच नसावे.

... सुरुवातीच्या काळात टागोरांचे वाङ्मय हे 'दुर्नीति प्रयोजक' म्हणून सनातनी बंगालने त्यांना धारेवर धरले. 'हा धनिक वर्गातला कवी, ग्रामीण जीवनातली आणि शेतकरी-कामगारांची दु:खे याला काय कळणार' म्हणून पांढरपेशे असूनही मार्स्कच्या पोथीवर हात ठेवण्याने आपण श्रमिकांचे प्रतिनिधी झालो असे मानणाऱ्या पुरोगाम्यांनी त्यांना बदनाम करायला सुरुवात केली. इकडे टागोर मात्र श्रीनिकेतनात, ग्रामातले विणकर, कुंभार, सुतार, बुरुड, चांभार उद्ध्वस्त होत चालले होते, त्यांचे उद्योग व्यवस्थित कसे चालतील हे पाहण्यासाठी नव्या नव्या योजना प्रत्यक्षात आणीत होते. देशोदेशींच्या तज्ञांना बोलावीत होते. कालीमोहन घोषांसारखे त्यांचे सहकारी खेड्यांपाड्यांतून पायपीट करीत होते. सकाळी सुंदर कविता लिहिणारा हा कवी दुपारी 'मलेरिया- निर्मूलनाच्या प्रचाराचे लेख लिहीत होता. नव्या बीजांचा अभ्यास करायचा, रोपणीच्या नव्या पद्धती शोधून काढायच्या, कातडी कमावून त्यांच्यावर अस्सल भारतीय शैलीच्या चित्रांचे ठसे उमटवून त्यांच्या पिशव्या आणि इतर वस्तू करायच्या, ह्यात 'थ्रिल' नाही. हे कार्य शांतपणाने, निराश न होता करायचे असते. त्यामुळे क्रांती म्हणजे बसपासून जे दिसेल ते जाळत सुटायचे आणि त्या ज्वालांना क्रांतीच्या ज्वाला समजायचे एवढीच ज्यांची कल्पना त्यांना टागोर क्रांतिकारक कसे वाटावे?

... अपूर्ण(- 'वंगिचत्रे' )

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित