आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
पु.लं.ची श्रद्धास्थाने
बालगंधर्व
टागोर
शेक्सपिअर
... माझ्या आयुष्यात एकाचढ एक गायकवादक ऐकायचा योग मला लाभला. त्या गायकांशी तुल्यबळ म्हणावे असे आजही तरूण गायक-गायिकांचे गाणे वाजवणे ऐकायला मिळते. पण बालगंधरर्वांच्या स्वराची किमया काय आहे ते मात्र कळत नाही. तास तास तयारीने किसलेल्या भिमपलासापुढे बालगंधर्वांनी त्याच भिमपलासात 'देवा धरिले चरण' एवढी नुसती तीन शब्दांची ओळ भिजवून काढली की ऐकणाऱ्याला सगळा भिमपलास एका क्षणात आपल्या शरीराबाहेर रंध्रारंध्रातून आत झिरपत गेल्याचा अनुभव यायचा. बरं हा काही 'रम्य ते बालपण' छाप अभिप्राय आहे असे नाही. मध्ये एक काळ असा आला होता की, चित्रपटसंगीताच्या लाटेत बालगंधर्वांची स्वरांची द्वारका बुडून जाणार की काय अशी भीती वाटत होती. पण कुठे काय जादू झाली कळत नाही. मराठी संगीतसृष्टीत ही सारी गायकी पुर्नजन्म घेतल्यासारखी प्रकट झाली. बालगंधर्वांना ज्यांनी आधी प्रत्यक्ष पाहिले नाही की प्रत्यक्ष ऐकलेही नाही अशी गुणी मुलं त्यांच्या ध्वनीमुद्रिका ऐकून, त्या गायकीतली गहिराई ओळखून ती गाणी आत्मसात करण्यात आनंद मानताना दिसायला लागली. मला कधी कधी इतकी मजा वाटते की एरवी सगळे 'मॉड' संस्कार असलेली तरुण मुलं मुली जर चांगल्या संगीताची नजर लाभलेली असेल तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या ज्या विशेष सौंदर्यस्थळांना साठ सत्तर वर्षापूर्वी दाद मिळायची त्याच जागांना तितक्याच आनंदानं दाद देतांना दिसतात. कलेच्या सौंदर्यात ही अशी एक कालनिरपेक्ष आनंद देणारी शक्ती असते. कलावंत जाणून घेणं म्हणजे त्या शक्तिची लीला जाणून घेणं असतं. असा स्थल काल निरपेक्ष आनंद देण्याचं सामर्थ्य एक तर निसर्गप्राप्त असतं किंवा निसर्गासारख्याच निरपेक्ष सहजतेने फुललेल्या कलेच्या दर्शनात असतं. त्यातली निरपेक्षता आणि सहजता हया दोन्ही गोष्टी अमोल असतात. खळखळत वाहणे हा निसर्गाचा सहजधर्म. तसाच सहजधर्म म्हणून गळ्यातून सूर वाहातो असा साक्षात्कार घडवणारा गतिमानी गायक कलावंत म्हणजे निसर्गाने निरपेक्ष भावनेने आपल्याला दिलेल्या पौर्णिमेच्या चांदण्याच्या, सूर्योदयाच्या फुलांच्या ताटव्यांच्या, खळाळणाऱ्या निर्झराच्या देण्यासारखे एक देणे असते. ते कोण आणि कुठे आणि कसे घडवितो हे कोडे सुटले असते तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या आनंदकोशाचे रहस्य उमगले असते. शंभर वर्षांपूर्वी सूर लयीचा स्वयंभू अवतार असल्यासारखा साक्षात्कार घडवणारे हे देणे महाराष्ट्रात जन्माला आले. सूर आणि लय यांचे पार्वती-परमेश्वरासारखे संपृक्त स्वरुपातले दर्शन त्याने रसिकांना घडवले आणि तेही कुठून? तर स्वत:ला शिष्ट समजणाऱ्या लोकांनी अपवित्र, ओंगळ मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचावरुन. आंगणातल्या मातीत रांगणाऱ्या बालकृष्णाने आपल्या चिमण्या मुखाचा 'आ' करुन यशोदेला विश्वरुपदर्शन घडविले... तसे ह्या बालगंधर्वानेही नाटकातल्या गाण्यासाठी लावलेल्या 'आ'कारामागचे भारतीय अभिजात संगीतातले विश्व जाणकारांच्या अनुभवाला आणून दिले. विचाराहीन अरसिकांनी हीनत्वाचा डाग देऊन चोरटा संबंध ठेवायच्या लायकीची कला ठरवलेल्या संगीतकलेला जणू शापमुक्ती लाभली. घराघरात नव्हे, तर मराठी माजघरात गंधर्वांचं गाणं गेलं. त्याचा आदर झाला. लाड झाले. स्त्री-पुरुषांनी मोकळ्या गळ्याने त्या गाण्यांशी सलगी जोडली. महाराष्ट्राला वरदानासारखं लाभलेलं हे स्वरदान. मनाच्या झोळीत ते कृतज्ञतेने स्वीकारावं आणि स्वत:ला धन्य मानावं. म्हणून म्हणतो, की ह्या नव्या वर्षाचं नाव पंचांगर्त्याच्या लेखी काहीही असलं तरी मराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे गंधर्वनाम संवत्सरच आहे.

... अपूर्ण(- कालनिर्णय १९८६)

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित