|
... कोणत्याही श्रेष्ठ कलेला हे असं एक सूक्ष्म आणि स्थूल स्वरुप असतं. सामान्यांना शेक्सपियर आनंद देऊन गेला तो त्या स्थूल
स्वरुपाच्या दर्शनानं. ताजमहाल सर्वसाधारण माणसालाही सुंदर वाटतो आणि स्थापत्यविशारदालाही सुंदर वाटतो. तज्ञांनादेखील ती
कला ज्यावेळी अतिशय उच्च स्वरुपाची वाटते, त्या वेळी त्या कलेचं मोठेपण शासत्रकाट्याची कसोटी लागून निरपवाद अशा प्रकारे
सिद्ध होतं. मात्र सामान्यजन सह्रदय अशा रसिकतेतून हे मोठेपण ओळखतात. किंग लियरच्या त्या कृतघ्न लेकी, मॅक्बेथची ती
महत्वाकांक्षी बायको, ती मुग्धा डिस्डेमोना, तिचा अतिशय उमदा, रांगडा पण संशयिपशाच्चानं पछाडलेला नवरा ऑथेल्लो, नवऱ्याचं
बारावं उरकण्याआधी दिराशी पाट लावण्याची घाई झालेली हॅम्लेटची आई, ज्युलिएटवर जान कुर्बान करणारा रोमिओ ह्या
सगळयांच्या स्वभावाचं ढोबळ स्वरुप गर्दीला मोह पाडतं. परंतु ह्या साऱ्यांच्या मागं काव्याचं जे एक अतिशय मोहक जाळं विणलं
आहे, त्यातून सौंदर्याची जी अवर्णनीय अनुभूती मिळते, शेक्सपियरच्या अफाट कविप्रतिभेचं जे दर्शन घडतं, त्याच्या सूक्ष्म
अवलोकनशक्तीची जी प्रचिती येते, एवढंच नव्हे तर त्याच्यातला जो तत्वज्ञ आढळतो, जीवनाचा भाष्यकार दिसतो, त्रिकालाबाधित
सत्याची सुभाषितासारख्या चार चपलख शब्दांत तो जी सूत्रं मांडतो, त्या त्याच्या अफाट पराक्रमामुळं मी मी म्हणणारे जाणते
त्याच्यापुढं शरण जातात.
मनुष्यस्वभावाचा पापुद्रा न् पापुद्रा सोलून काढायची ही कला या माणसाला कशी साध्य झाली?
स्ट्रॅटफर्डसारख्या खेड्यातल्या ह्या माणसानं ही उग्र साधना कशी केली असेल? त्याची भाषा 'अर्थ बोलाची वाट पाहे' म्हणत उभी
राहिली कशी? अत्यंत क्षुद्र कोट्या, भडक प्रसंग, खून, मारामाऱ्या, आत्महत्या असला ढोबळ मालमसाला वापरुनही तो कसल्या तरी
अमृतासारख्या दिव्यौषधीतून बुडवून काढावा आणि त्याला अद्वितीय काव्यस्वरुप द्यावं ही किमया ह्मा माणसाला सापडली कशी?
केवळ शेक्सपियरचा अभ्यास हेच आपलं जिवितकार्य समजणाऱ्या महापंडितांनाही याची उत्तरं नाही सापडली. एकेका भाषेला काय
भाग्य आहे! त्या इंग्लंडला हा शेक्सपियर कल्पवृक्षासारखा लाभला. मानवी स्वभावाचा, कविकल्पनेचा शब्दांच्या लीलेचा असा एक
प्रकार नाही की ज्याची इच्छा या कल्पवृक्षाखाली करावी आणि ती फळाला येऊ नये. उगीच नाही इंग्रज लोक म्हणाले, 'ब्रिटिश
साम्राज्य राहो वा न राहो, आमचा शेक्सपियर आम्ही सोडणार नाही.' इंग्रजी भाषेत ह्यानं लिहिलं, ती भाषा वापरली, पण अशी की
त्या इंग्रजी वाक्यांना अमरपण लाभले. भाषेचं देणं सव्याज फेडलं. आज असंख्य वाक्प्रचार, शब्दयोजना, संदर्भ आणि सुभाषितं अशी
आहेत, की ती वापरणारांना ह्यांचा उगम शेक्सिपयरमध्ये आहे याची जाणीवही नाही. एका म्हातारीनं शेक्सिपयरची नाटकं वाचली
आणि म्हणाली, 'त्याच्यात नवीन काय आहे? शेक्सपियर इज फुल ऑफ कोटेशन्स.' 'जग ही एक रंगभूमी आहे' असं शेक्सपियरनंच
म्हटलंय. पण त्याची रंगसृष्टी मात्र साऱ्या जगाला विळखा घालून गेली. ही पात्रं इंग्रज राहिलीच नाहीत. शेक्सपियरनं त्यांना फक्त 'ए
नेम अँन्ड ए लोकल हॅबिटेशन' दिलं. हे चिरंतनाच्या वाटेवरचे प्रवासी. हॅम्लेटच्या वेदनेला मरण नाही. रोमिओचा विश्वास अमर आहे.
तो आजच्या यंत्रयुगातल्या तरुणाच्या अंत:करणातूनही उमटतो. हा नाटककार मानवी स्वभावाचा अणूच फोडून गेला. कुठल्याही
नाटकाचं कुठलंही पान उघडावं, मन गुंगवून ठेवणारी एक तरी ओळ सापडतेच. फक्त इंग्रजी भाषा समजली पाहिजे. भाषांतरात
शेक्सिपयर खूपदा निसटतो. त्याला नाइलाज आहे. पण भाषांतरित शेक्सपियरची साऱ्या जगातल्या प्रेक्षागारात पडलेली मोहिनी
पाहून मतीच गुंग होते. ऑक्सफर्डमधल्या एका प्रोफेसरनं आपल्या एका जपानी विद्यार्थ्याला विचारलं, 'का रे बुवा, तुला शेक्सिपयर
कां आवडतो?' विद्यार्थी म्हणाला, 'कां म्हणजे? त्याची सारी पात्रं जपानी आहेत म्हणून.' समर्थ रामदास पंढरपूरला गेले आणि
विठ्ठलाची मूर्ती पाहून म्हणाले, 'येथे कां रे उभा रामा?' वरची वेष्टनं काढून अंतर्याम न्याहाळता आलं की देशकालाचे भेद नाहीसे
होतात आणि आतला गुणदोषयुक्त निखळ माणूस दिसायला लागतो... ... अपूर्ण(- 'रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका' )
|
|
|