|
.. पण हया झाल्या वैयक्तिक गोष्टी काही सामाजिक कार्यही असतात. चट्कन आपल्या डोळयांपुढे
येतात. आणि वाटतं, इथे आपण काहितरी करायला पाहिजे होतं. राहून गेलं. दारिद्र्यरेषेच्या
खालीच कोट्यावधीलोक ज्या देशात राहतात, तिथे तर अशा लोकांच्या जीवनात आनंदाची
क्षेत्रं निर्माण करायची कितीतरी कामं आहेत. आपण असंच एखादं काम हाती घ्यायला हवं
होतं. त्या कामाच्या मागे लागायला हवं होतं. त्यातली एक गोष्ट राहून गेल्याचं मला फार
वाईट वाटतं. एकेकाळी मी गात असे. गळाही वाईट नव्हता. आज वाटतं, गरीबांच्या वस्तीत जाऊन
तिथल्या पोरांना जमवून आपण गायला हवं होतं आणि त्यांना गायला लावायला पाहिजे होतं.
असं केलं असतं तर आयुष्य आणि निसर्गाने दिलेला तो गाणारा गळा सार्थकी लागला असता. कधी प्रवासात
असतांना एखादया खेडयात गावाबाहेरच्या वडाखाली पोरं सूरपारंब्या खेळतांना दिसली की माझ्या
आयुष्यातल्या राहून गेलेल्या गोष्टींची मनाला फार चुटपुट वाटते. आता गळाही गेला आणि पायातली
हिंडायची आणि पोरांबरोबर नाचायची शक्तिही गेली. सुसज्ज रंगमंचावर रांगेत उभे राहून
गायन मास्तरच्या इशाऱ्याबरोबर गाणारी मुलं-मुली छान दिसतात. तसला गाण्यांचा कार्यक्रम मला करायचा नव्हता. तहानभूक
विसरुन नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या पोरांचा ताफा घेऊन मला गायचं होतं. त्या हॅमलिनच्या पिपाणीवाल्यासारखं. एखादया खेडयात
जावं आणि पिंपळाच्या पारावर हातातली दिमडी वाजवीत
पोरांची गाणी सुरु करावी. भरभर पाखरांसारखी पोरं जमली असती. फाटकया-तुटकया कपडयातली, शेंबडी,
काळीबेंद्री. पण एकदा मनसोक्त गायला लागल्यावर तीच पोरं काय सुंदर दिसली असती.
आणि त्याहूनही रंगीबेरंगी कपडे घालून गावोगाव हिंडत त्यांच्यात नाचणारा आणि गाणारा मी अंतर्बाहय सुंदर होऊन गेलो असतो.
आयुष्यात पोरांचं मन गुंगवणारं आपण काही करु शकलो नाही,याची माझ्या मनाला फार खंत आहे.
मुलांच्या मेळाव्यात लोक मला साहित्यिक, कलावंत वगैरे म्हणतात त्यावेळी मी ओशाळून जातो.
आयुष्यात मनाला खूप टोचून जाणारी राहून गेलेली कुठली गोष्ट असेल तर मुलांच्या मेळव्याला
आनंदाने न्हाऊ घालणारं असं आपण लिहू शकलो नाही, नाचू शकलो नाही हीच आहे. आता फक्त
ती गोष्ट राहून गेली असं म्हणण्यापलीकडे हातात काही नाही.
... अपूर्ण
(-कालनिर्णय) |
|
|