आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
साहित्यिक पु. ल.
एक जानेवारी: एक संकल्प दिन !
मुंबईने मला काय दिले?
एका गाढवाची गोष्ट
राहून गेलेल्या गोष्टी
मी- एक नापास आजोबा
सध्या तुम्ही काय करता? या प्रश्राचं दोन नातवांशी खेळत असतो याच्या इतकं सत्याच्या जवळ जाणारं उत्तर माझ्यापाशी नाही. नातवंडांची तलफ कशी येते हे आजोबा-आजीच जाणतात. नातवंड हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे. गुडघ्यांच्या संधिवातावर अचपळ नातवामागून धावणं हा रामबाण उपाय आहे. आणि एरवी खांदेदुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच उचलतांना जरासुद्दा तक्रार करीत नाहीत.
उत्तम बुध्धिमत्तेचा सगळयात चांगला प्रत्यय चांगल्या बालबुध्धितून कसा येतो हे दुसऱ्या बालपणाची पहिल्या बालपणाशी दोस्ति जमल्या शिवाय कळत नाही. माझ्या बुध्धिमत्तेविषयी बाळगोपाळांना शंका असण्याचा माझा अनुभव जुना आहे. कठिण प्रश्न भाईकाकांना न विचारता माईआत्तेला विचारायला हवेत हा निर्णय वीस-एक वर्षांपूर्वी दिनेश, शुभा वगैरे त्या काळात के. जी. वयात असलेल्या माझ्या बालमित्रांनी घेतला होता. माझ्या व्यक्तिमत्वातच, फक्त बाळगोपाळांना दिसणारा अज्ञानप्रादर्शक गुण असावा, नाही तर इतक्या अडिच वर्षांच्या चिन्मयालाही आमच्या घरातलं सर्वात वरिष्ठ अपील कोर्ट शोधायला माझ्या लिहिण्याच्या खोलीत न येता स्वयंपाक घराच्या दिशेनी जाणं आवश्यक आहे हे कसं उमगतं?
सध्या, म्हणजे काय? या प्रश्नाच्या माऱ्याला तोंड द्यावं लागत आहे. बरं, नुसत्या उत्तरानी भागत नाही, मला दाखव असा हुकूम सुटतो. 'आकाश म्हंजे काय?' पासून ते 'आंगन म्हंजे काय?' इथपर्यंत हा प्रश्न जमीन अस्मान आणि त्यातल्या अनेक सजीव-निर्जिव वस्तूंना लटकून येत असतो.
'आंगन म्हणजे काय?' या प्रश्नाने तर माझी विकेटच उडवली होती. सहकारी गृहनिर्माण संस्कृतीत 'आंगण' केंव्हाच गायब झालेलं आहे. घरापुढली म्युनिसिपालटीनी सक्तीने रस्त्यापासून बारापंधरा फूट सोडायला लावलेली जमिनीची रिकामी पट्टी म्हणजे आंगण नव्हे. तिथे पारिजात असावा लागतो. जमीन शेणाने सारवलेली असावी लागते, कुंपणाच्या एका कोपऱ्यांत डेरेदार आंब्याचा वृक्ष असावा लागतो, तुळशीवृंदावनही असावे लागते. रात्रीची जेवणे झाल्यावर एखाद्या आरामखुर्चीवर आजोबा आणि सारवलेल्या जमिनीवर किंवा फारतर दोन चटया टाकून त्यावर इतर कुटुंबीय मंडळींनी बसायचं असतं अशा अनेक घटकांची पूर्तता होते तेंव्हा त्या मोकळया जमिनीचं आंगण होतं. कुंपणावरच्या जाईजुईच्या सायंकालीन सुगंधांनी आमोद सुनास जाहल्याचा अमृतानुभव देणारं असं ते स्थान चिनूच्या 'आंगन म्हणजे काय?' या प्रश्नाचं उत्तर देतांना तो अडीच वर्षांचा आहे हे विसरुन मी माझ्या बाळपणात शिरलो. माझ्या डोळयांपुढे आमच्या जोगेश्वरीतल्या घरापुढलं आंगण उभं राहिलं. त्याला त्यातलं किती कळत होतं मला ठऊक नाही. पण विलक्षण कुतूहलाने भरलेले दोन कमालीचे उत्सुक डोळे या आजोबाला काय झालं या भावनेने माझ्याकडे पाहाताहेत आणि माझी आंगणाची गोष्ट ऐकताहेत एवढंच मला आठवतं चिनूचं ते ऐकणं पाहण्याच्या लोभाने मी मनाला येतील त्या गोष्टी त्याला सांगत असतो. मात्र त्यात असंख्य भानगडी असतात. एखाद्या हत्तीच्या चित्रावरुन हत्तीची गोष्ट सांगून झाली की 'ही आता वाघोबाची गोट्ट कल' अशी फर्माईश होते. एकेकाळी पौराणिक पटकथेत झकास लावणीची 'स्युचेशन' टाकण्याची सुचना ऐकण्याचा पूर्वानुभव असल्यामुळे मी त्या हत्तीच्या कथेत वाघाची एन्ट्री घडवून आणतो. हत्तीच्या गोष्टीत वाघ चपलख बसल्याच्या आनंदात असतांना धाकटया बंधूंचा शिट्टी फुंकल्या सारखा आवाज येतो,
'दाखव'.
'काय दाखव?' मी.
'व्हाग!' चि. अश्विन.
हत्तीच्या चित्रात मी केवळ या बाबालोकाग्रहास्तव वाघाला घुसवलेला असतो. प्रत्यक्ष चित्रात तो नसतो. पण हत्तीला पाहून डोंगरामागे वाघ कसा पळाला याची गोष्ट रचावी लागते. सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या निर्मितिक्षम प्रतिभेची सकाळ-संध्याकाळ अशी तोंडी परीक्षा चालू असते. पहिली गोष्ट चालू असतांना 'दुशली शांग' अशी फर्माईश झाली की पहिल्या गोष्टीत आपण नापास झालो हे शहाण्या आजोबांनी ओळखावे, आणि निमूटपणाने दुसऱ्या गोष्टीकडे वळावे. या सगळया गोष्टींना कसलंही कुंपण नसल्यामुळे इकडल्या गोष्टीतला राजा तिकडल्या गोष्टीतल्या भोपळयांतून टुणूक टुणूक जाणाऱ्या म्हातारीला जाम लावून पाव देतो. वाघाचा 'हॅपी बड्डे' होतो आणि 'इंजिनदादा इंजिनदादा काय करतो?' या गाण्यातल्या इंजिनाला रुळावरुन उचलून आकाशात नेणारी स्चकृत कडवीही तयार होतात.
आज या वयातही सहजपणाने जुळलेलं एखाद्या कवितेतलं यमक पाहून एखाद्या शाळकरी मुलासारखा मला अचंबा वाटतो. शब्दांच्या नादानी कविता नाचायला लागली की आनंद कसा दुथडी भरुन वाहतो याचं दर्शन शब्दांच्या खुळखुळ्यांशी खेळणाऱ्या पोरांच्या चेहऱ्यावर होते. पण नातवंडाबरोबर आजोबांनाही तो खेळ साधला तर हरवलेलं बालपण पुन्हा गवसतं. हल्ली हा खेळ मला रोज खेळावा लागतो. एकदा या चिनू आशूला घेऊन 'चक्कड माडायला' निघालो होतो. 'बाबा ब्लॅकशिप' पासून 'शपनात दिशला लानीचा बाग' पर्यंत गाण्याचा हलकल्लोळ चालला होता. शेवटी हा तार सप्तकातला कार्यक्रम आवरायला मी म्हणालो, 'आता गाणी पुरे गोष्टी सांगा' गोष्टीत किंचाळायला कमी वाव असतो.
'कुनाची गोट्ट?'
'राजाची गोष्ट सांग... आशू, चिनू दादा गोष्ट सांगतोय गप्प बसून ऐकायची. हं, सांग चिनोबा...'
'काय?'
'गोष्ट!'
'कशली?' 'राजाची'. मग चिनूनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.
'एक होता लाजा.' त्यानंतर डोळे तिरके करुन गहन विचारात पडल्याचा अभिनय, आणि मग दुसरं वाक्य आलं, 'तो शकाली फुलाकले गेला.'
'कोणाकडे?' शिकारीबिकारीला जाणाऱ्या राजांच्या गोष्टी मी त्याला सांगितल्या होत्या. पण फुलाकडे जाणारा राजा बहुदा शांतिनिकेतनातला जुना छात्र असावा.
'फु... ला... क... ले... ' चिनू मला हे आवाज चढवून समजावून सांगतांना माझ्या प्राचीन शाळा मास्तरांच्या आवाजातली 'ब्रह्मदेवानी अक्कल वाटतांना चाळण घेऊन गेला होतास काय पुर्ष्या ऽ ऽ ' ही ऋचा पार्श्वसंगीतासारखी ऐकू आली.
'बरं, फुलाकडे... मग?'
'मग फुलाला म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला?'
क्षणभर माझ्या डोळयांवर आणि कानांवर माझा विश्वास बसेना. हे एवढंसं गोरंपान ध्यान उकाराचे उच्चार करतांना लालचुटुक ओठांचे मजेदार चंबू करीत म्हणत होतं 'लाजा फुलाकले गेला आनि म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला?' एका निरागस मनाच्या वेलीवर कवितेची पहिली कळी उमलतांना मी पाहतोय असं मला वाटलं.
'मग फुल काय म्हणालं?' एवढे चार शब्द माझ्या दाटलेल्या गळ्यातून बाहेर पडतांना माझी मुष्किल अवस्था झाली होती.
'कोनाला?' 'अरे राजाला. राजानी फुलाला विचारलं ना, फुला रे फुला तुला वास कोणी दिला? मग फुल काय म्हणालं?'
'तू शांग...'
मी काय सांगणार कपाळ! फुला रे फुला तुला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर दयायला लागणारी बालकवी, आरती प्रभू किंवा पोरांच्या मनात नांदणारी गाणी लिहिणाऱ्या विंदा करंदीकर, पाडगावकरांना लाभलेल्या प्रतिभेची वाटणी चालू असतांना देवा पुढे चाळण नेण्याची दुर्बुद्धी मला नक्की झालेली असावी. 'फुला रे फुला तुला वास कोणी दिला?' या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला सापडलेलं नाही. सुदैवाने परीक्षक हा प्रश्न विचारल्याचं विसरुन गेले असले तरी त्या परीक्षेत मी नापास झाल्याची भावना मला विसरता येत नाही. नुसती गोळया-जर्दाळूंची लाच देऊन आजोबा होता येत नाही. त्याला फुलाला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तरही ठाऊक असावं लागतं आणि तेही यमकाशी नातं जुळवून आलेलं.

... अपूर्ण (-कालनिर्णय)

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित