आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
छोट्यांसाठी पु.ल.
अभ्यास: एक छंद !
वारणानगरीतले बालकिन्नर
विद्यार्थ्यांशी हितगुज
माझ्या विद्यार्थी- मित्रांनो,मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते आहे याचा खूप आनंद झाला. एकच गोष्ट जराशी खटकली, ती म्हणजे मी इथं बोलत असतांना तुम्ही मला दिसत नाही आणि मी तुम्हांला दिसत नाही. मी तुम्हांला दिसलो नाही म्हणून फारसं बिघडत नाही. तुमच्या आवडत्या सिनेनटासारखा मी देखणाही नाही. पोशाखाबिशाखाच्या बाबतीतही ही कानगोष्ट आहे म्हणुनच सांगतो, जरासा गबाळा आहे. आताच माझ्या लक्षात आलंय, की मी माझ्या बुशकोटाचं चौथं बटन तिसऱ्या काजात खुपसून तिसऱ्या बटनाला वाऱ्यावरच सोडलं आहे.

पण ते काही का असेना, तुमच्याशी बोलतांना माझं काही चुकलं नाही म्हणजे झालं. शिवाय समर्थांनी म्हटलंच आहे, की वेश असावा बावळा. माझ्या अंगी नाना कळा काही नाहीत, तरीही 'वेश असावा बावळा, परि अंगी नाना कळा' हे समर्थांचं वचन मी इमानानं पाळत आलो आहे. तेव्हा तुमच्याशी बोलताना शेक्सपिअरच्या ज्युलियस सीझर नावाच्या नाटकातला मार्क ऑटनी म्हणतो तसं मीही थोडासा फरक करुन म्हणेन, 'मित्र हो, भारतीय हो आणि बालनागरिक हो, जरा तुमचे कान इकडे करा.' मी शाळेत होतो त्या वेळी जेव्हा माझे गुरुजी 'इकडे कान कर' म्हणायचे, त्या वेळी ते काही निराळया कारणाने म्हणत असत. त्या अर्थाने नाही म्हणत मी... मी काय सांगणार आहे ते ऐकाल का? अशी विनंती करण्यासाठी म्हणतो आहे. माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो जरा इकडे कान द्या.

तसं सांगायचं म्हणजे तशी आपली अगदीच ओळख नाही असं नाही. कदाचित माझी संपूर्ण पुस्तकंही तुमच्यापैकी काहीजणांनी आणि काहिजणींनी वाचली असतील. म्हणजे यापूर्वी मी तुमच्याशी पुस्तकांतून बोलालो आहे. लेख लिहिणं म्हणजे दुसरं काय? पुस्तकांतून तुमच्याशी बोलणचं की नाही? माझी गोष्ट सोडा. मी फार थोर लेखक नाही, पण तुमच्याशी पुस्तकांतून निरनिराळया विषयांवर किती थोर माणसं बोलत असतात. ज्ञानेश्वर बोलतात, तुकाराम महाराज बोलतात, साने गुरुजी बोलतात, जोतिबा फुले, टिळक, आगरकर, गडकरी, केशवसुत, बालकवी असे संत, विचारवंत, कादंबरीकार, नाटककार, कवी तुमच्याशी बोलत असतात. वास्तविक ही माणसं आज आपल्यात नाहीत. तरी त्यांचं बोलणं मृत्यूसुद्धा थांबवू शकला नाही. तुम्ही एखाद्या थोर लेखकाचा धडा म्हणून जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या लक्षात हे आलंय का, की आपण एका थोर माणसाच्या सहवासात आहोत? हे तुमच्या लक्षात केव्हा येईल ठाऊक आहे? तुम्ही ज्या वेळी पुस्तक हे थोरांना भेटण्याची संधी आहे या दृष्टीनं ते हाती घ्याल तेव्हा.

परीक्षेला पुस्तक नेमलंय म्हणून वाचलं पाहिजे अशा भावनेनं जर तुम्ही पुस्तक हातात धरलंत तर त्या लेखकाशी तुमचा संवादच सुरु होणार नाही. कादंबरी असो किंवा अगदी रुक्ष वाटणारं भूगोलाचं पुस्तक असो. कुणीतरी आपल्याशी केलेली ही कानगोष्ट आहे. कुणी आपल्याला खूप आवडलेली माहिती खुप हौसेनं देतो आहे, अशा भावनेनं जर आपण ते हाती धरलं नाही तर तुमचा संवादच सुरु होणार नाही.

नव्या सत्राच्या आरंभी तुम्हाला सांगायची मुख्य गोष्ट ही, की गणिताच्या काय, भुगोलाच्या काय किंवा भाषा विषयाच्या काय कुठल्याही पुस्तकाच्या सहवासात तुम्ही असताना एखाद्या मित्राच्या सहवासात आणि तेदेखील आपल्यापेक्षा ज्यानं खूप निरनिराळया गोष्टींचा अनुभव घेतलाय अशा मित्राच्या सहवासात आता दोन-चार तास काढणार आहोत असे समजावे. म्हणजे जे पुस्तक उगीचच तुम्हाला परीक्षेची भिती घालत येतं, ते तुमच्या मित्रासारखं तुम्हाला वाटेल. नाकातोंडात पाणी जातं म्हणून पाण्याशी वैर करणाऱ्या भित्र्य मुलासारखं तुम्ही पुस्तकाशीच वैर केलंत, तर त्या मुलाला जसा मस्त सूरबीर मारुन पोहण्याचा आनंद मिळत नाही, तसा तुम्हांलाही ज्ञानाचा आनंद मिळणार नाही.

मी कशाचा आनंद म्हणालो? ज्ञानाचा आनंद नाही का? थोडासा जड वाटलाना शब्दप्रयोग? तसा तो जड नाही. 'ज्ञान' म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट आहे अशी आपली उगीचच समजूत करुन दिलेली असते. साध्या भाषेत सांगायचं तर ज्ञानाचा आनंद म्हणजे 'अरेच्चा! आपल्याला कळलं' असे वाटून होणारा आनंद! मग तो एखाद्या यापूर्वी कधी न कलेल्या शब्दाचा असेल.., न सुटणारं गणित सुटल्यावर होणारा असेल किंवा एखाद्या संगीतातला राग ओळखता आल्यावर होणारा असेल. तुम्ही सगळे विदयार्थी आहात नाही का? विदयार्थी म्हणजे तरी काय? विद् म्हणजे जाणणे, कळणे; अर्थी म्हणजे इच्छा असलेला. आता काही कळून घ्यावं अशी ज्याला इच्छाच नसेल तो मात्र केवळ शाळेत जातो आणि हजेरीपटावर नाव आहे म्हणुन त्याला विदयार्थी म्हणता येईल का? नाही म्हणून तुम्ही माना हलवल्यात ते दिसलं बरं का मला. तेव्हा शाळेत आला आहात ते आपल्याला जे जे काही या जगात दिसतं त्यामागचं रहस्य काय आहे बुवा, ते कळावं म्हणून आला आहात. या जगात लाखो वर्षापासून माणसांचं येणं आणि जाणं चालूच आहे. जन्मल्यापासून जास्तीत जास्त शंभर वर्षापर्यंत माणसाला या जगात मुक्काम ठेवता येतो. आता मी तुमच्याशी बोलत असतांना देखील टयँ.. टयँ.. असा आवाज करत काही नवे रहिवासी आले असतील. मी किंवा तुमचे आईवडील, तुमचे गुरुजी, तुमच्या आधी काही वर्षे इथं आलो. त्या आधीही काही माणसं आली. आधी जी माणसं आली त्यांनी या जगात तुमच्यापेक्षा जास्त वर्ष काढल्यामुळे तुमच्यापेक्षा त्यांना अधिक गोष्टी कळल्या आहेत. तुम्हाला अजून पुष्कळ गोष्टी कळायच्या आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी कळलेल्या नाहीत किंवा समजायला अवघड जातात त्या समजावून देण्यासाठी तुमचे शिक्षक असतात.

'अज्ञान' असणं यात काहीही चूक नाही; पण 'अज्ञान' लपवण्यासारखी चुकीची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. विशेषत: कळण्याची इच्छा मनात बाळगून येणाऱ्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी 'आपल्याला कळलं नाही' हे न सांगणं हा तर मी म्हणेन एक प्रकारचा अपराध आहे. न्यूटनसारखा एवढा थोर वैज्ञानिक म्हणाला होता ना, की वाळवंटातल्या एका वाळूच्या एका कणाएवढीही मला विज्ञानाची ओळख पटली नाही म्हणून. मग तुम्हा-आम्हाला कसली लाज! आपल्याला कळलं नाही की सरळ न घाबरता हात वर करावा आणि म्हणावं 'सर, मला इथपर्यंतच कळलं. इथून पुढलं नाही लक्षात आलं.' चांगल्या शिक्षकांना असले प्रश्न विचारणारा विद्यार्थी फार आवडतो. विषयाला धरुन प्रश्न विचारल्यावर चांगले शिक्षक 'गप्प बस' असं कधीच सांगत नसतात. तसं पहायला गेलो तर आपण सगळे विद्यार्थीच आहोत. शाळेतलं शिक्षण संपल्यावर जर सगळयांनी नवीन माहिती मिळवायचं सोडून दिलं असतं तर जगात कधी प्रगती झाली असती का? हे जग इतकया अजब अजब गोष्टींनी भरलं आहे, की त्यांतल्या एखाद्या गोष्टीचा थांगपत्ता लावायचा म्हणजे वयाच्या साठाव्या आणि सत्तराव्या वर्षीसुद्धा विदयार्थ्यासारखंच त्या गोष्टीचा अर्थ समजून घ्यायच्या मागे लागावं लागतं. मोठे गवई रोज पाच-पाच, सहा-सहा तास गायनाची मेहनत करत असत, हे ठाऊक आहे का तुम्हांला? अहमदजान तिरखवाँ साहेब नावाचे आपल्या देशातले फार मोठे तबलजी. ते सांगत होते, की दहा दहा, पंधरा-पंधरा तास त्यांचा सराव चालायचा. मी म्हणालो, 'खाँसाहेब, तुम्हाला कंटाळा येत नसे का हो?' ते मला म्हणाले, 'अरे बेटा माशाला कधी पोहायचा कंटाळा येतो का?' नव्वदाव्या वर्षीही ते तीस वर्षाच्या तरुणासारखा तबला वाजवत. सांगायचा मुद्दा काय, एखाद्या गोष्टीचं रहस्य काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही त्याच्या मागे लागलात, की तो अभ्यास हासुद्धा एक खेळ होतो. मी तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत आणखी एक गुपित सांगणार आहे. पुष्कळदा आपल्याला वाटतं, की अमुक एक विषय आपल्याला आवडत नाही. समजा तुम्हाला वाटतं, इंग्लिश आपल्याला आवडत नाही. फार अवघड आहे. मग तोच विषय पकडा बघू कशी माझ्याशी दोस्ती करत नाही तो, म्हणून त्याच्या मागे लागा. त्या भाषेच्या काय काय खोडी आहेत त्या लक्षात घ्या.. त्या शब्दांशी थोडक्यात म्हणजे मैत्री जमवा. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे गुणांचा हिशेब विसरुन जा. शंभरापैकी पस्तीस गुण मिळाले, की पास करतात म्हणून उरलेल्या पासष्ट गुणांचं अज्ञान तुम्ही खपवून घेत असलात, तर मग तुम्ही खरे विद्यार्थीच नव्हे.

तुम्ही एखाद्याशी दोस्ती जमवता म्हणजे काय? त्याच्या फक्त नाकाशीच दोस्ती जमवता? किंवा हाताशीच जमवता? तुमचा दोस्त तुमच्या घरी न येता त्याने नुसत्याच आपल्या चपला पाठवल्या तर चालेल तुम्हाला? नाही चालणार. तो संपूर्ण पणाने तुमच्या घरी यायला हवा. तसंच विषयाचं आहे. तुमच्या पुस्तकाशी तुमचा संपूर्ण परिचय हवा. भूगोलाशी पुस्तकातली पस्तीस गुणांपुरतीच पानं पाठ केली असं म्हणणं म्हणजे भूगोलशी तुम्ही दोस्तीच केली नाही म्हणण्यासारखं आहे. इंग्रजीसारख्या विषयात पोस्टाच्या तिकिटासारखा एकेक शब्द गोळा करत गेलात आणि तुमचा आल्बम जसा तुम्ही पुन्हा पाहता तसा पाहत पाहत गेलात, की पहा तुमची इंग्रजीशी दोस्ती जमते की नाही ते. मग शेक्सिपअर, डिकन्स, बर्नाड शॉ असले जगप्रसिद्ध लेखक, पत्र-मित्र असतात तसे तुमचे ग्रंथ-मित्र होतील. जी गोष्ट इंग्रजीची तीच गणिताची, विज्ञानाची, भूगोलाची आणि इतर विषयांची. एखाद्याशी मैत्री जमवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या मैत्रीचा हात त्याच्या पुढे करणं हा. तुमच्या कानात सांगण्यासारखी हीच कानगोष्ट आहे. खेळापासून ते गणितापर्यंत सगळयांशी मैत्री करा. म्हणजे पहा, परीक्षा हा त्या सगळया मित्रांशी आपली जोरदार दोस्ती आहे, असा जगाला दाखवून देण्याचा आनंदाचा सोहळा होईल. या सोहळयात खुप यशस्वी व्हा... ही तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित