आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
छोट्यांसाठी पु.ल.
अभ्यास: एक छंद !
वारणानगरीतले बालकिन्नर
विद्यार्थ्यांशी हितगुज
मी वारणानगरातल्या त्या सभागृहात गेलो आणि रंगमंचावरची ती बालचमू पाहून चाटच पडलो. सतारींची उंची सतार- वादकांपेक्षा अधिक होती. समोरच तीन पेटीवादक. पेटीपलिकडे फक्त तीन चिमुकली डोकी दिसत होती. त्यांतली एक मुलगी तर चौथे वर्ष लागताक्षणीच शंकररावांकडे वयाचा दाखला घेऊन आलेली असावी. तबलेवाले बसल्यानंतर तबल्या डग्ग्यांएवढेच उंच वाटत होते. नाना प्रकारची देशी-विदेशी वाद्ये होती. व्हायलिन्स होती, मेंडोलिन्स, तारशहनाई, सारंगीसुद्धा होती. सतारी त्या चिमुकल्या हातांना पेलत नसल्यामुळे त्यांना लाकडी स्टॅन्डचा आधार दिला होता. ढोलकी होती, ढोलक होता, इलेकट्रिक गिटार होती, इलेक्ट्रॉनिक ऑर्गन- एखाद्या चित्रपटातल्या संगीतवाल्यांचा वाद्यवृंद असावा असा वाद्यवृंद. तेवढ्यात एक चुण- चुणीत देखणा मुलगा उभा राहिला. त्याने नामवंत साहित्यिक, इचलकरंजी संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री. पु. ल. देशपांडे यांच्या स्वागताचे दणदणीत भाषण ठोकले. 'त्यांना फक्त अर्धाच तास वेळ आहे हे आमचं दुर्भाग्य... आमचा कार्यक्रम साडेतीन- चार तासांचा आहे...' असे ठसक्यात सांगता सांगता 'आम्ही एका अटीवर त्यांच्यापुढं आमचं वृंदवादन सादर करीत आहोत... आमच्या कार्यक्रमानंतर त्यांनी आम्हांला पेटी वाजवून दाखवली पाहिजे...'

स्वागतपर भाषण संपले. एक पावणेतीन फूट उंचीची चिमुरडी उभी राहिली. तिने कंडक्टरचे 'बेटन' हलवीत लयीचा इशारा दिला आणि अहो आश्चर्यम्! त्या चिमुकल्या तबलियाने ऐसा फर्मास तुकडा मारला की क्षणभर मला हा प्लेबॅक वगैरे आहे की काय असे वाटले. तिथून पुढला अर्धा, पाऊण, एक, सव्वा करत, दीड तास केव्हा झाला ते कळले नाही. समोरचे चिमुकले गोविंदराव टेंबे दात(काही पडलेले)- ओठ खाऊन पेटीवर लयबद्ध तानांचे सट्टे फेकत होते. व्हायिलन वाजवणारी मुलगी विलक्षण दमदारपणाने वाजवत होती. संतूरसारख्या बिकट वाद्यावरची नेमकी तारच झणकारत होती. चारी मुले लयीत मुरलेली होती. नुसती सरांनी बसवलेली गाणी वाजत नव्हती. सुरात आणि लयीत घुसून वाजवत होती. शंकररावांनी त्यांच्या अंत:करणात गाणे पेरले होते...

... अपूर्ण (-'दाद')
अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित