आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
खऱ्या खुऱ्या व्यक्ती आणि वल्ली
शर्वरीराय चौधरी
शर्वरीचा दिनकरदांनी परिचय करुन दिला. त्यानंतर बरेच दिवस त्याची आणि माझी पुन्हा भेट झाली नाही. एके दिवशी दुपारी खोलीचे दार वाजले. मी दार उघडून पहातो तो दारार शर्वरीराय चौधरी उभे. दाढीत एक चाफ्याचे फूल खोवले होते. बरोबर संगीत भवनातले माझ्या परिचयाचे दोन चार विद्यार्थी. त्याने माझ्याशी एकदम बंगालीतच बोलायला सुरुवात केली. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याला बंगालीखेरीज दुसरी देशी भाषा येत नाही आणि जी परदेशी भाषा येते ती इटलियन ! हिंदी बोलतो. पण अचाट. एकूणच बंगाल्यांचे हिंदी अचाट. आपल्या बिऱ्हाडी मला निमंत्रण देण्यासाठी शर्वरी आला होता.

दुपारी चारच्या सुमाराला मी त्याच्या खोलीवर गेलो. 'आशून-आशून' म्हणून त्याने स्वागत केले आणि स्वागतपर गीत सुरु करावे तसा रेकॉर्ड प्लेअर सुरु केला आणि अहो आश्चर्यम एका क्षणात गोविंदराव टेंब्यांनी वाजवलेल्या सोहनी मधल्या 'प्यारा मेंडा नजर महि आवंदा'च्या हार्मोनियम मधल्या सुरांनी खोली भरून गेली. मी अवाक! शांतिनिकेतनात एका पस्तिशीच्या घरातल्या तरुण शिल्पकाराच्या खोलीत आमच्या गोविंदरावांची पेटी वाजत होती, आणि तो शिल्पकार देखील, 'गुंतवला कि नाही जाळ्यात?' अशा चेहऱ्याने माझ्याकडे पहात होता. किती वर्षांनी मी गोविंदरावांच्या पेटीचे सूर ऐकत होतो! आणि अशा अकल्पितपणाने अकल्पित ठिकाणी! त्याक्षणी आमची दोस्ती जमली. कारण त्यानंतर त्याने चक्क बालगंधर्वांची 'सुजन कसा'च सुरु केली. आता जिव्हाळ्याच्या बंधनासाठी आणखी दुसऱ्या कसल्याही उपचाराची आवश्यकता नव्हती. त्या क्षणापासून शांतिनिकेतनाच नव्हे तर वर्धमान स्टेशनातून मुंबईला जाणाऱ्या गाडीत मी बसेपर्यंत आम्ही सतत बरोबर होतो. त्याचे अध्यापनाचे आणि माझे अध्ययनाचे तास संपले की अड्डा सुरु !

एक रुंदसा दिवाणखाना; एक बेडरुम आणि छोटेसे स्वैपाकघर हे त्याचे बिऱ्हाड. इथे चोवीस तास विद्यार्थी-विद्यार्थीनींना मुक्तद्वार. खोलीत अखंड टेपरेकॉर्डर किंवा रेकॉर्ड प्लेअर वाजत असतो. भिंतीवर शर्वरीच्या काही प्रसिद्ध शिल्पांचे फोटो लावले आहेत. काही फोटोग्राफ्स दारांना नुसतेच अडकवले आहेत. पण जपानी तोकोनामासारखा कोपरा आहे. तिथे मात्र फैयाज खांसाहेबांचा मैफिलीत गात बसल्याचा एक दुर्मिळ फोटो, त्याच्याजवळ सिद्धेश्वरीबाईंचा, बाजूला एकमेकींना कडकडून भेटताहेत असा मी त्याला भेट म्हणून दिलेला फोटो भले मोठे एन्लार्जमेंट करुन लावला आहे! हे सारे शर्वरीचे देव आणि देवता. टेपरेकॉर्डर आणि डिस्कप्लेअर ही पूजेची उपकरणे! शेकडो ध्वनिमुद्रिकांचा संग्रह आहे. केवळ भारतीय संगीतच नव्हे तर युरोपिय आणि जपानी वगैरे आशियाई संगीतही आहे. मी एकदा त्याच्या निर्व्यसनीपणाची चेष्टा केल्यावर म्हणाला, "एवढे हे एक व्यसन मला कफल्लक बनवायला पुरेसे आहे. बाकीच्या व्यसनाला पैसा कुठून आणू?"
आणि शर्वरीचे हे सुरांचे व्यसन खरोखरीच अचाट आहे. माझ्या आयुष्यात मी गाण्याचा षौक करणारी खूप माणसे पाहिली. पण तासाभरात ज्याला तहान लागते असा हाच! रात्री झोपेतून पाणी प्यायला उठावे तसे हा रेकॉर्ड लावायला उठतो. दोन चार गाणी ऐकतो आणि पुन्हा झोपतो. त्याच्याकडे किती जुन्या ध्वनिमुद्रिका ऐकायला मिळाल्या! गोहरजान, मलकाजान, मोजूद्दिनखां यांच्या ठुमऱ्या, दादरे, बनारच्या कुणा काशीबाईच्या ठुमऱ्या ऐकताना सिद्धेश्वरीचा आवाज फिका वाटला. शिवाय बिजलीसारखा तानेचा सट्टा. पाचपाचा सहासहा तास हा श्रवणाचा कार्यक्रम चालायचा. पण सांगता मात्र केसरबाईंच्या ध्वनिमुदिकांनी. ध्वनिमुद्रिकेतून केसरबाईंचे सूर उमटू लागले कि शर्वरी म्हणायचा- "आह की पोरिष्काssरशूर !" खानदानी संगीतप्रेमी लोकांत केसरबाई केरकरांविषयी अत्यंत आदर. पण त्यातल्या त्यात बंगालात फारच. त्यांचा तो 'परिष्कर सूर!' स्वच्छ साफ. बंगालीत 'परिष्कार' म्हणतात. विशेषत: 'पोरिष्काssर' असा त्याचा उच्चारच स्वच्छतेचे चित्र डोळ्यापुढे आणतो. केसरबाईंचे गाणे ऐकून खुद्द रविंद्रनाथांनी 'अद्भुताचा अनुभव' आला असे लिहिले आहे. केसरबाईंच्या त्या जुन्या दुर्मिळ ध्वनिमुद्रिका शर्वरीकडे पुन्हा ऐकायला मिळाल्या. तान निघाल्यापासून संपेपर्यंत तिच्या आकारात कुठे कमीजास्तपणा नाही. आलापी किंवा तान सुरु होतानाचा श्वास आणि समेत विलीन होतानाचा श्वास ह्याच्या भात्यात फरक नाही. गाण्यातले गाणेपण सुटायचे नाही. खोटी नजाकत नाही. पण पांडित्याला कुठे रुक्षपणाचा स्पर्श नाही. ग्रीक शिल्पासारखे स्वरस्थापत्य! निरनिराळया गायक गायिकांच्या ध्वनिमुद्रिका ऐकता ऐकता शेवटी केसरबाईंची रेकॉर्ड लागली कि सारी तिर्थे हिंडून गंगाकिनारी येऊन तो शुभ्र संथ प्रवाह पहात बसल्यासारखे वाटायचे. तसलाच तो खोल, संथ आणि 'परिष्कार' स्वरप्रवाह. शर्वरीची फार मोठी महत्वाकांक्षा त्याने मला एकदा बोलून दाखविली.
"केसरबाईंच्या स्टॅचू करायला मिळेल का मला? मला एकदा त्यांच्या पायावर नेऊन घाला." (आणि केसरबाईंच्या कृपेने शर्वरीची ही महत्वाकांक्षा पुरी झाली.)

... अपूर्ण
(वंगचित्रे)

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित