आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
खऱ्या खुऱ्या व्यक्ती आणि वल्ली
शर्वरीराय चौधरी
पु.लं.च्या साहित्यामध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण किंवा विलक्षण असा साहित्यप्रकार म्हणजे त्यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे ! एखादा नट आपल्या अभिनयातून एखादी व्यक्तिरेखा इतकी हुबेहुब जिवंत करतो, कि ती व्यक्तिरेखा त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक भागच वाटू लागते आणि मग तो नट त्या व्यक्तिरेखेमुळे लोकप्रिय होतो. पण आवाज, अभिनय असे काहिही नसताना केवळ लेखणीच्या माध्यमातून एखादी व्यक्तिरेखा जिवंत करावी इतकी, कि त्या व्यक्ति पु.लं.च्या संपर्कातीलच असाव्यात इतकेच काय आपल्याही ओळखीच्या वाटाव्यात हे पु.लं.च्या लेखणीचे कसब केवळ अप्रतिम असे होते.
यामुळेच कदाचित शाळा-कॉलेजच्या वयात मला हरीतात्या, नारायण, गटणे सुद्धा खऱ्या व्यक्ती वाटत, तर रावसाहेब मला कित्येक दिवस काल्पनिक असावेत असंच वाटत असे. थोडक्यात काय पु.लं.च्या व्यक्तिचित्रणामध्ये त्या खऱ्या व्यक्ति असोत किंवा काल्पनिक त्या प्रत्येकाची पु.ल. आपल्याची फक्त ओळख नाही तर छान मैत्री करुन देत.
पु.लं.च्या गणगोतात, अनेक अवलिया व्यक्ती ज्या कुठल्यातरी कलेच्या ध्यासाने, सामाजासाठी काहितरी करायच्या उदात्त हेतूने, कुठल्यातरी प्रेरणेने सतत झपाटलेल्या आणि अविरत कार्यरत होत्या. अश्या खऱ्या खुऱ्या वल्लींचे पु.लं. बरोबरचे 'मैत्र जीवाचे' असे बंध पु.लं.नी अनेक ठिकाणी लेखनातून उलगडले. या लेखनातून या व्यक्तींवरचे पु.लं.चे प्रेम तर कळतेच पण त्यांच्या मोठेपणाची ओळख सुद्धा यातून पु.लं.मुळे आपल्याला होते.
अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित