आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
पु.ल.गौरव दर्शन!
कौटुंबिक पु.ल.
साहित्यिक पु.ल.
साहित्यसंमेलनाध्यक्ष पु.ल.
छायाचित्रकार पु.ल.
नाट्यसंमेलनाध्यक्ष पु.ल.
काव्यधर्मी पु.ल.
समाजकृतज्ञ पु.ल.
समानधर्मी पु.ल.
चित्रपटसृष्टीत पु.ल.
संवादिनीकार पु.ल.
मानसन्मान
चित्रनायक पु.ल.
आकाशवाणी, दूरदर्शनवर
दिग्दर्शक पु.ल.
बहुरुपी पु.ल.
नाटककार पु.ल.
व्यंगचित्रकारांचे पु.ल.
निर्भीड पु.ल.

गेल्या ५०-६० वर्षांच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या उत्तुंग व्यक्तीमत्वापैकी 'चतुरस्त्र' हे विशेषण खऱ्या अर्थाने लागू पडेल असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे ! आपल्या बहुरंगी व्यक्तिमत्वामुळे सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं फक्त पु.लं.नी आणि आपल्या हयातीतच दंतकथा बनण्याचं भाग्य लाभलं, ते देखील फक्त पु.लं.नाच. ते जे अद्भूत आयुष्य जगले त्याच्या स्मृती चिरंतर रहाव्या म्हणून 'लोकमान्य सेवा संघ' हि पार्ल्यातील तितकीच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संस्था पुढे आली, आणि एक कायमस्वरूपी संग्रहालय उभं राहिलं, 'पु. ल. गौरव दर्शन !'

पु. लं. ची निवडक छायाचित्रे, हस्तलिखिते, पत्रं, त्यांना लाभलेले मानसन्मान, स्मृतीचिन्हे यांचा समावेश असलेल्या या संग्रहालयाची मूळ कल्पना सुनिताबाईंची आणि त्याला 'पु. ल. गौरव दर्शन !' असं समर्पक नांव सुचवलं ते सुद्धा सुनीताबाईंनीच. त्यामुळे नामकरणापासून ते छायाचित्राची निवड, त्यांची मांडणी यांत कल्पकता होती. यापूर्वी सुनीताबाईंनी जतन केलेला हा संग्रह 'पितृतुल्य' अशा 'लोकमान्य सेवा संघा' च्या वास्तूत असावा अशी पुलंची इच्छा होती. लोकमान्य सेवा संघाचे कार्यवाह श्री. शशिकांत गानू, अध्यक्ष श्री. मनोहर काळे उत्साहाने तयारीला लागले. संस्थेचे मानद वास्तुशास्त्राज्ञ प्रवीण काणेकर संग्रहालायाचा आराखडा तयार करू लागले. सर्व छायाचित्रांवर पुन्हा नव्याने संस्कार करणे गरजेचे होते. पु.लं.चे निस्सीम चाहते आणि छायाचित्रण कलेतील ज्येष्ठ अरुण आठल्ये यांनी ती बाजू सांभाळली. फोटोंची मांडणी, त्यांची रचना, ग्रंथसजावट आणि मांडणी या कामात निष्णात असलेले ख्यातनाम कैलिओग्राफर श्री. सत्यनारायण वडीशेरला यांनी केली.

पु. लं. वरील अलोट प्रेमामुळे या सगळ्या मंडळीच्या मेहनतीतून हे आगळे वेगळे संग्रहालय उभे राहिले. ४०' x ४०' आकाराच्या सभागृहात वस्तूंची मांडणी २१ दालनांमध्ये केली आहे. काही दुर्मिळ कौटुंबिक छायाचित्रे, पु. लं. ची सर्व पुस्तके, कॅसेट्स, नाटके, चित्रपट, इतर मान्यवरांबरोबरची छायाचित्रे, अशी जवळजवळ ४०० छायाचित्रे, हस्तलिखिते, लेख, वेगवेगळ्या भावमुद्रा असलेली पु.लं.ची मोठ्या आकारातील ६४ छायाचित्रे विशेष म्हणजे या ६४ छायाचित्रांपैकी कुठल्याही २ फोटोंमधल मूड सारखा नाही, असा 'वि'पूल खजिना या संग्रहालयाच्या निमित्ताने रसिकांसमोर खुला करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार आणि पु.ल.प्रेमी श्री. शर्वरीराय चौधरी यांनी केलेला पु.लं.चा अर्धपुतळा सुद्धा याच ठिकाणी ठेवण्यात आला आहे. शेक्सपिअरच्या मूळ गावी त्याचे स्मारक बघायला दूरवरून लोक येत असतात. मराठी माणसाचे हे पु.ल.प्रेम बघायला जेव्हा दूरवरून लोक येतील तेव्हा स्फूर्तीने, अभिमानाने, आनंदाने लहान-थोर सगळेच भारावून जातील. जो निखळ आनंद पु.लं.नी आयुष्यभर लोकांना दिला, तसाच आनंद आज पु.लं. नसतानासुद्धा या संग्रहालयाच्या निमित्ताने नव्याने अनुभवतील. पु.लं.च्या अफाट कर्तृत्वासमोर नतमस्तक होतील. काळ आपल्या गतीने पुढे जात राहिल, जीवनमूल्य बदलतील, पण पु.लं.चा अर्धपुतळा या सगळ्या मंतरलेल्या आठवणींचा कायमचा साक्षीदार असेल. ज्याचा उल्लेख पु.ल. आदराने 'पितृतुल्य' असा करत, त्याच संस्थेच्या वास्तूत हे संग्रहालय साकार झाले आहे. पु.ल. म्हणत असत, हाक माझा सर्वांत मोठा गौरव !

या संग्रहातील सर्व विभागांची थोडक्यात माहिती, आणि काही छायाचित्रे खास पु.ल.प्रेमींसाठी !

पत्ता: 'पु.ल.गौरव दर्शन', लोकमान्य सेवा संघ, राम मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई- ५७. दूरध्वनी: ०२२-२६१४ २१२३, ०११-२६१४ १२७६
अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित