आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
अजरामर पु.ल.
एक झुंज वाऱ्याशी
गांधीजी
दिलीप प्रभावळकर,सयाजी शिंदे,वसंत सोमण, गौरी केंद्रे यांचा सशक्त अभिनय व वामन केंद्रे यांचे दिग्दर्शन यातून निर्माण झालेली अजरामर कलाकृती - 'एक झुंज वाऱ्याशी'. पु.लं. नी लिहिलेल्या किंवा रुपांतरित केलेल्या नाटकांपैकी एक. हे नाटक बघण्याचे भाग्य ज्या प्रेक्षकांना लाभले त्यांच्या अनुभवांचे किस्से आजही ऐकायला मिळतात. आपल्या समोर हे सारे नाटकात घडते आहे याचा विसर पडून ते बघणारा त्यात इतका एकरुप होत असे की, त्यातल्या पात्रांप्रमाणे तो स्वत:च विचारात गुरफटून जात असे आणि ते सारे खऱ्याप्रमाणेच अनुभवत असे. मग नाटक केव्हा संपले याचे भानही न राहता, त्याची अवस्था एक सुंदर कलाकृती अनुभवल्याचा आनंद पण डोके सुन्न व गोठलेले त्यामुळे यापुढे काहीही विचार करण्याची शक्ती संपलेली अशी विचित्र होत असे. यापुढे आपल्याला हे नाटक बघता येईल की नाही माहित नाही, पण वाचायला नक्कीच मिळेल... 'मौज प्रकाशनने' प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील वामन केंद्रे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग.
रशियन नाटकरार व्हॅलादलीन दोझोत्स्रेव यांच्या मूळ रशियन नाटकाच्या 'द लास्ट अपॉइंटमेंट' या इंग्रजी भाषांतराचे 'एक झुंज वाऱ्याशी' हे श्री. पु.ल.देशपांडे यांनी केलेले मराठी रुपांतर. हे रुपांतरही भाईंनी खास त्यांच्या शैलीत केले आहे. म्हणजे हे नाटक रुपांतरित आहे, असे सांगितले नसते तर हे परदेशी नाटकावर आधारित आहे अशी कोणाला शंकाही आली नसती, इतके ते अस्स्ल आपल्या मातीतले झाले आहे. त्यातले वातावरण, घटना, पात्रे, संघर्ष, विचार, मांडणी हे सारे जणू तुमच्या-आमच्या जीवनाचाच एक अविभाजय भाग आहे असे वाटते. रुपांतरकारांसाठी 'एक झुंज वाऱ्याशी' हा एक आदर्श पाठ ठरावा.

... आजच्या या आधुनिक युगात माणूस स्वत:मधले माणूसपण गमावत चाललाय. नीतिकल्पना, त्याग, प्रेम, परोपकार यांचे जोखड त्याला पेलेनासे झालेय. वर्ग, जात, वर्ण, देश, प्रांत, भाषा, लिंगभेद, संस्कृती यांचा आधार, तो स्वार्थ, सत्ता, ऐश्वर्य, भोग यांसाठी घेऊ लागला आहे. अशा काळामध्ये या नाटकातल्या माणसाचा संघर्ष आपल्याला आतून हलवतो. घडीभर का होईना, आपण माणूस असल्याची जाणीव करुन देतो, स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल विचार करायला लावतो. या नाटकाचे हेच असामान्यपण आहे, असे मला वाटते. सर्वसाधारणपणे कलाकृतीमधे तत्त्वज्ञान आलेच तर ते इतरांना कळू नये अशा पद्धतीने योजलेले असते. सहजासहजी कळते ते कसले तत्त्वज्ञान असा काहीसा समज त्या योजनेमागे असतो. परंतु एखादा अशिक्षित, अडाणी माणूस सहज बोलता बोलता असे काही बोलून जातो, की आपल्याला चक्रावल्यासारखे होते. कारण त्याच्या बोलण्यातले मर्म आपल्याला उमगलेले असते आणि ते इतक्या सोप्या पद्धतीने मांडता येते याचे आश्चर्य वाटत राहते. या कलाकृतीमध्ये वाक्यावाक्यांत विचार आहे, तत्त्वज्ञान आहे आणि तेही सहज कळेल अशा पद्धतीने मांडलेले आहे. या नाटकातले एकेक पात्र जेव्हा आपली वैचारिक बाजू मांडते तेव्हा त्याची बाजू आपल्याला पटत जाते आणि आपण सर्वस्वी त्याच्या बाजूचे होऊन जातो. दुसऱ्या क्षणी दुसऱ्या पात्राने पहिल्याचा विचार खोडत स्वत:ची वैचारिक बाजू मांडल्याबरोबर आपण पहिल्याची बाजू सोडून दुसऱ्याची घेतो, कारण त्याचाच विचार बरोबर आहे असे वाटायला लागते. त्यामुळे नाटक बघता बघता, नकळत आपण स्वत: चारही पात्रे होऊन जातो. त्या त्या व्यक्तिरेखेचा विचार जगून बघतो. या नाटकाच्या मांडणीचा हा आत्मा आहे असे वाटते.

या नाटकातला विचार हा कुठल्याही एका राजकीय विचाराशी नाते सांगणारा नसून तो एकूण माणसाच्या भल्याचा पाठपुरावा करणारा आहे. एका सामान्य माणसाने थेट आरोग्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये घुसून त्याचा राजीनामा मागणे आणि तोही असे म्हणत की, "जे सत्तेवर असतात त्यांनी प्रामाणिक असायला हवं. आणि जो उपदेश ते इतरांना करतात तो त्यांनी स्वत:च्या आचरणात आणायला हवा. नाहीतर आम्हाला त्यांचा विश्वास वाटणार नाही. आणि म्हणून मी सांगतोय की तुम्ही राजी नामा द्या." हा पवित्राच मला खूप धाडसाचा आणि नाट्यमय वाटतो. हा विचार इथेच थांबत नाही तर "इतरांसाठी मी संघर्ष का नाही करायचा? ह्या जगात आपण काय दुसरे लोक जे पिकवतात तेच खायला आलोय का? आपण स्वत: झाड लावून त्याची फळं का नाही खायची?" अशा वास्तव वळणापर्यंत तो येतो. पुढे हा विचार "निसर्ग माणसाहून अधिक श्रेष्ट असे कधी काही निर्माण करणार नाही. निसर्गाच्या संग्रहात आता देण्यासारखं आणखी काहीही उरलेलं नाही. तुम्ही एवढंसं का होईना, पण सुसूत्र असं काहीतरी निसर्गाला देऊन थोडीफार परतफेड करू शकता. सावळ्या गोंधळानं नव्हे- निसर्गाला सावळा गोंधळ मान्यच नाही. निसर्गाला मान्य असलेली एकच गोष्ट माणसाला परिपूर्ण करणं." अशा शाश्वत सत्याच्या साक्षात्कारापर्यंत येऊन पोहोचतो. ...

या नाटकात दोन मोठे धोके होते. ते म्हणजे ह्या गंभीर नाटकाचे गंभीर रुपांतर विनोदी लेखक पु.ल.देशपांडे यांनी करणे आणि या गंभीर नाटकात अतिशय गंभीर भूमिका विनोदी नट श्री.दिलीप प्रभावळकर यांनी करणे. भीती अशी होती, की प्रेक्षक घरातून निघताना, आपल्याला काहीतरी छानसे विनोदी पहायला मिळणार ह्या विचाराने आले आणि समोर असे गंभीर नाटक उभे राहिले तर ते पाहतील का? परंतु असा एकही प्रेक्षक मला भेटला नाही, की ज्याने या गंभीर नाटकावर प्रेम केले नाही.

... अपूर्ण
- वामन केंद्रे (प्रस्तावना/दिग्दर्शकाचे मनोगात) 'एक झुंज वाऱ्याशी'(मौज प्रकाशन गृह)

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित