चिंतामणराव गुरु आणि पु. ल.
शिष्य यांच्या कर्तुत्वात एक मजेदार सारखेपणा आहे. दोघांनाही
साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार
प्राप्त झालेले आहेत. आणि तसे ते भारतात कोणालाही मिळालेले
नाहीत !
लहानपणापासून पु.लं. च्या घरची आणि आजोळची वडीलधारी मंडळी
त्यांची हौस पुरविण्यात उत्तेजन देत असत. संगीत आणि नाटक
हे या मंडळींचे मुख्य छंद. लहानपणापासूनच पु. ल. पेटी
वाजवायला शिकले. वयाच्या चौदाव्या वर्षी साक्षात् बालगंधवांसमोर
पेटीवादन करुन त्यांनी त्यांची शाबासकी घेतली होती!
- श्री. ज्ञानेश्वर नाडकर्णी ('पु. ल. नावाचे गारुड')
१९६५ साली पु.ल. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम
मांडे यांनी 'पुलायन' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली.
त्यात त्यांनी 'पुलकित' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो
खूपच लोकप्रिय झाला.
पु. लं. ना ८० वर्षे पूर्ण झाली त्यावेळी आकाशवाणीवरच्या
प्रसारित कार्यक्रमाचा जो भाग आहे; त्यातली वसंतराव देशपांड्यांच्या
मुलाखतीच्या वेळची ती घटना! पु. ल. वसंतरावांची मुलाखत
घेत होते. मी रेकॉर्डिंग करत होतो. मुलाखत बेफाम रंगली
होती, ती वाढल्यास जादा टेप लावून मी तयार होतो. माणसे
तल्लीन झाली होती आणि धाडकन पु. ल. बोलते झाले; 'बरं वसंतराव
नमस्कार',नेमक्या अठ्ठाविसाव्या मिनिटाला पुलंनी मुलाखत
संपवली होती. त्याबद्दल नंतर विचारणा करताच ते मला म्हणाले,
'राम अरे आपण रेडियोची माणसे. आपल्या रक्तातच टाईमसेन्स
भिनलेला आहे.'
- श्री. श्रीराम मांडे, आकाशवाणी सहाय्यक, पुणे ('साहित्य
सूची' जून २००१)
पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे 'गुळाचा गणपती'! त्यात
सर्व काही पुलंचे होते. कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत
आणि दिग्दर्शन, एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा!
हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय?
पुण्यात 'गुळाचा गणपती' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट
पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं,
सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून
चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला!
हिंदी-चिनी युद्धाच्या वेळी आघाडीवरला एक मराठी सैनिक
कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होता. त्याच्या अंगावर पुरेसे
लोकरी कपडे नव्हते. म्हणून बरोबर आणलेले काही दिवाळी अंक
तो धगीसाठी जाळू लागला. जाळण्याआधी चाळता चाळता त्याला
एका अंकात 'पु. ल. देशपांडे' हे नाव दिसले. लेखाचे नाव-'माझे
खाद्यजीवन'! तो अंक आगीत टाकण्याआधी त्याने वाचायला घेतला.
थंडीत एकूणच जिवाला तो वैतागला होता. पण पुलंचा हा लेख
वाचल्यावर 'छे! छे! हे सारे खाण्यासाठी तरी मला जगलेच
पाहिजे' असा त्याने आपल्या मनाशी निर्धार केला!
- श्री. जयवंत दळवी ('पु. ल. एक साठवण')
|
|
पु. ल. गेल्यावर आमचा कलकत्त्याचा
समीक्षक मित्र शमिक बॅनर्जी पुण्यात आला होता त्याने ही
आठवण सांगितली. पु. ल. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पाच
वर्षे मानद उपाध्यक्ष होते. एका बैठकीनंतरच्या भोजनोत्तर
मैफलीत एक प्रसिद्ध नाटककार खूप सात्विक संतापले होते. त्यांना
न विचारता त्यांच्या नाटकांचे कोणी अन्य भाषेत प्रयोग केले
होते. त्यामुळे कॉपीराईटचा भंग होतो असा प्रकार होता. त्यांची
अनेकांनी समजूत घातली पण त्यांचा राग धुमसत होताच. वाद वाढल्यावर
पु. ल. तेथे असलेली हार्मोनियम काढून म्हणाले, मी आता तुम्हाला
माझा प्रयोग करुन दाखवतो. त्याचा मात्र कॉपीराईट कोणाकडे
नाही. कोणीही हा प्रयोग गावोगाव कोणत्याही भाषेत करावा,
असे म्हणून पु. लं.नी हार्मोनियम वाजवणे सुरु केले. जरा
रंग भरल्यावर ते आलाप आणि ताना घेऊ लागले. त्याला अर्थातच
अभिनयाची जोड होती. पण एकही शब्द नव्हता. नंतर सर्वांच्या
लक्षात येऊ लागले की आलापी आणि तानांमधून एक तरुण आपल्या
प्रेयसीकडे प्रेमयाचना करतो आहे, तानांमधून ती तरुणी लाजते
आहे. मग ताना मारीत त्यांचे प्रेम चालते. मग दोघांचे ताना
आणि आलापीमधून लग्न होते. ताना मारीत बाळंतपण होते. मग भांडण...
पुन्हा ताना... पुन्हा प्रेम जमते. ताना मारीत संसार फुलतो
असा मामला पु. लं.नी एकही शब्द न उच्चारता केवळ ताना आणि
आलापीमधून अर्धा तास जिवंत केला. समोरचे सगळे गडाबडा लोळायचे
तेवढे राहिले होते. शमिक म्हणाला, 'कोणतीही तयारी, पूर्वसूचना
नसताना हा माणूस इतका चोख परफॉर्मन्स देत असेल तर त्यांचे
परफॉर्मन्स विषयीचे चिंतन किती परिपक्व असेल? ह्या माणसाभोवती
महाराष्ट्राचे सांस्कृतिक जग केंद्रित का होते, ह्याचे जणू
उत्तरच पु. लं.नी आम्हाला त्या अर्ध्या तासात दिले. '
- श्री. सतीश आळेकर ('पु. ल. नावाचे गारुड')
|