आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
इन्स्टन्ट पु.ल.

कोल्हापूर आणि तेथील एकूणच भाषाव्यवहार म्हणजे पु. लं. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापुरी समाजाइतकाच कोल्हापुरी भाषेचा बाज सांगतांना ते म्हणाले, 'इथे रंकाळयाला रक्काळा म्हणतात पण नगाऱ्याचा नंगारा करतात. कोल्हापुरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरीबाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. 'त्यानं शेतात ऊंस लावला' याचं इंग्रजी रुपांतर इथल्या मुन्सफानं एकदा 'he applied US in his farm' असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.

'आमच्या एका मित्राने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पातळाऐवजी पु.लं. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहिले, 'प्रिय .... हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसंगी पातळाऐवजी पुस्तक देण्यामागील विशुद्ध हेतू फसवणूक हा नसून हसवणूक हाच आहे. तुझाच .... !' त्यावर ही मित्रपत्नी चिडली. तिनं थेट पु. लं. कडेच धाव घेतली. पु. लं.नी ही त्याच अर्पण पत्रिकेखाली स्वाक्षरिनिशी आपल्या मित्राला समजावले, 'आपल्याकडे नवऱ्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर !'

(- श्री. अरुण आठल्ये यांच्या लेखामधून)

अलीकडेच मुंबईत पडलेल्या प्रलयंकारी पावसाच्या दिवशी एन. सी. पी. ए मधून 'वराती ' ची तालिम आटोपून मी व माझी मैत्रिण मीना फडके, कमरेएवढया साचलेल्या पाण्यातून चिंब भिजून माझ्याघरी पोहाचलो. मीनाला त्या रात्री माझा गाऊन घालून माझ्याचकडे रात्र घालवावी लागली. ही गोष्ट मी सगळयांना ऐकवली होती. भाईंच्याही ती कानावर गेली. त्यावर ते म्हणाले, 'तरीच परवा यशवंत देवांना कुणीतरी म्हणाले, की गाऊन दाखवा.' तर नीला म्हणाली,'बरोबर आणला नाही.'

कोल्हापूरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मैत्रिण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सांगत होती, 'काय सुंदर सुंदर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात. अप्रतिम नमुने आणि सुंदर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळयात की दुसरं काहीच घालायला नको.' हे ऐकत जवळपास असलेले भाई मिश्किलपणे हळूच म्हणाले, 'खरं सांगतेस की काय ?'क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर मैत्रिणीची लाजून व आमची हसून मुरकुंडी वळली.

(- सौ. करुणा देव, रविवार सकाळ, ७ नोव्हे. १९९३)
-----------
नवीन शुद्ध लेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुद्धलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडळात घाटत होतं. त्यावर पु. लं. नी खालील छेद दिला,'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुद्धलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो, लिवा. क्याऽऽऽ ळंऽऽ!'

'वैद्यकातली एकच गोष्ट या क्रिकेटमध्ये येऊन चपलख बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चूर्ण व्हावे. गोट साफ.' - इति पु.ल.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काही कारणास्तव हिंदुजा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. ते ऐकताच पु. ल. उद्गारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिंदुजा में है' असं लिहायला हरकत नाही.'

साहित्य संघात कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु. लं. ना आवर्जून बोलावले होते. नाटकाचा पहिला अंक चालू असतांनाच पडद्यामागे धडाम्‌कन्‌ काहीतरी पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु. लं. ना म्हणाला, 'काय पडलं हो?''नाटऽऽक दुसरं काय?' पु. लं. उत्तरले.

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित