आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.
विज्ञानप्रेमी पु.ल.

साहित्य, संगीत, नाटक इ. कला क्षेत्रांत रमत असताना, पुलंना आपल्या संस्कृतीची, जुन्याची ओढ होती, परंतु सनातनी गोष्टींची चीड होती. समाजाला उपकारक असे शोध, त्यामागची शास्त्रज्ञांची धडपड याचे त्यांना कौतुक वाटे. वैज्ञानिक उपक्रम राबवणाऱ्या संस्था, प्रयोशाळा, पुण्यातील 'आयुका' सारख्या संस्थांना सुद्धा 'पु. ल. देशपांडे फाऊंडेशन' तर्फे देणग्या दिल्या होत्या. पुलंचा एक कमी परिचित पैलू म्हणजे, समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा, व विशेषत: मराठीतून विज्ञानाचा प्रसार व्हावा, याबद्दल त्यांना खूप आस्था होती.
'मराठी विज्ञान परिषदेने' १९७१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'अस्मिता महाराष्ट्राची' या ग्रंथाला पुलंची प्रस्तावना होती! त्या प्रस्तावनेतील काही भाग..

'... मी जीवनातील कोडी बुद्धीने आणि अभ्यासाने जाणून घेईन, ही जिद्द आणि मला ती जाणता येईल हा आत्मविश्वास म्हणजे वैज्ञानिक दृष्टी. माणसाला अज्ञात अशा असंख्य गोष्टी आहेत. परंतु त्या अज्ञाताचा भेद करुन ते मी ज्ञात करुन घेईन, ह्मा धडाडीने निसर्गाचे विराट स्वरुप जाणून घेणे हे वैज्ञानिकांचे कार्य आहे. आणि ते वैयक्तिक साक्षात्काराच्या समाधानात न राहता, त्या ज्ञानाभोवती कसलीही गूढ वलये किंवा बुवाबाजी न करता, ते ज्ञानसोपान स्वच्छपणे ग्रंथातून दाखवणारे हे जगाचे खरे उपकर्ते आहेत. वैयक्तिक मोक्षाकडून सामाजिक मोक्षाकडे नेणारे विज्ञान हे जपतप-अनुष्ठानापेक्षा अधिक तारक आहे. विठ्ठलाला अठ्ठावीस युगात हटवता न आलेला पंढरपुरातला कॉलरा विज्ञानाने हटवला... नव्या मोटारीपुढे नारळ फोडून तिची गुलाल लावून पूजा करणारे मोटार नावाची एक नवीन देवता निर्माण करतात. ते मनाने वैज्ञानिक झालेले नसतात. खंडाळ्याच्या घाटात एक शिंगरोबाचे देऊळ आहे. त्याला दहा पैसे ठेवून प्रवास निर्विघ्न कर असे म्हणणाऱ्यांना दहा पैशाच्या जकातीवर देव खूष होतो, हा देवाचा अपमान आहे असे वाटत नाही. त्या शिंगरोबाला दहा हजार रुपये दिले तरी पेट्रोलशिवाय मोटार चालणार नाही.. वैज्ञानिकांनी आता विज्ञान परिषद स्थापन केली आहे. खरे सांगायचे तर विज्ञानाच्या बाबतीत आमची पिढी ह्मा पोरांपुढे साक्षात अडाणी आहे... चंद्रावरच्या स्वारीचे माझे शिक्षण माझ्या कुटुंबातील बालगोपालांनी केले आहे. आणि हे सारे ज्ञान त्यांनी मराठी पुस्तकांतून आणि लेखांतून मिळवले आहे. मराठी परिभाषेला हसणारे लोक मराठी भाषेला मिळणाऱ्या ह्मा नव्या शक्तीकडे पाहतच नाहीत...'
'टेलिफ़ोनचा जन्म' या श्रृतिकेतील काही भाग...

निवेदक : यशाचा तो खडकाळ रस्ता अजून वर्षभर तुडवायचा होता. हे नवीन यंत्र बोजड दिसत होतं. ते सुबक करणं आवश्यक होतं. नवी सामग्री हवी होती. बेल आणि वॉटसन् राबत होते. हबर्ड वकील द्रव्याचा पुरवठा करित होते. असला धनिक पाठीशी असणं हे बेलचं भाग्य! अनेक संशोधक बिचारे संशोधनासाठी लागणारा पैसा गोळा करतां करतां नामोहरम झाले.
१८७६ च्या उन्हाळयात फिलाडेल्फियाच्या शतसंवत्सरिक प्रदर्शनांत अलेक्झांडर ग्रॅहाम बेलने आपला टेलिफ़ोन लोकांपुढे ठेवला.
(संगीत)
आवाज: काय आहे हो हें?... टेलिफोन? काय? तारेतून आवाज जातो? हॅ हॅ हॅ हॅ !
निवेदक: वर्तमानपत्रांचाही असाच कुत्सित स्वर होता. न्यूयॉर्क ट्रिब्यूनच्या अंकांत होतं-
आवाज: असल्या यंत्राचा काय उपयोग आहे? सरकारी कामांत अनेक वेळां गुप्ततेची आवश्यकता असते. दूरदूरचे सरकारी अधिकारी जर ह्या यंत्रांतून मोठमोठ्यांने बोलू लागले, एखादा प्रियकर प्रेयसीच्या कानांत बोलूं इच्छीत असला तर?
बेल: अस्सं! म्हणजे टेलिफोन ही लोकांना चेष्टा वाटतेय्. ह्या संशोधनांचे काय काय फायदे आहेत ते शेवटचा श्वास असेपर्यंत साऱ्या देशाला पटवून देईन.
(संगीत)
निवेदक: एका वर्षाच्या आंत बेलनें संशोधकांचीच नाही तर साऱ्या देशाची खात्री पटवली. ह्या तरुण संशोधकाची दैनंदिनी त्याची ग्वाही देते.
बेल: मे १८७७. मेबलच्या वडिलांनी बेल टेलिफोन कंपनी स्थापन केल्याची हकीगत सांगितली. अनेकांनी भांडवल गुंतवलं आहे. टेलिफोनचं उत्पादन, टेलिफोन भाड्यानं द्यायचं, तारा टाकायच्या, साहाय्य करणाऱ्यांचा उत्साह पाहून मन आनंदानं भरुन येतं-- ताजा कलम हबर्ड वकीलांना मेबलविषयी विचारायला हरकत नाही.
(संगीत)
बेल: जून १८७७- पुढच्या आठवड्यांत माझा आणि मेबलचा विवाह- मधुचंद्रासाठीं इंग्लंडची सफर.
(संगीत)
बेल: जून १८७८- हारफर्डला पहिला सेंर्टल स्विच बोर्ड उघडला. एका स्विचबोर्डावर आठ कनेक्शन्स- कल्पनासुद्धां नव्हती.
(संगीत)
बेल: बोस्टनला सेंट्रल स्विचबोर्ड सुरु झाला. स्विचबोर्डावर काम करायला पुरुषांपेक्षा बायका अधिक योग्य आहेत. एक तर त्यांची बोटं भराभर काम करतात आणि आवाज गोड.
(संगीत)
बेल: ऑक्टोबर १८८१. पंचेचाळीस मैल लांबीच्या अंतरावर टेलिफोन बसवले. लोक म्हणतात, इतक्या दूरवर आवाज जाणार नाही. कां नाही जाणार? शेकडो मैल दूर जायला हवा. हजारों मैल अंतरावरची माणसं टेलिफोननी कां जोडली जाऊ नयेत?
निवेदक: ही कल्पना प्रत्यक्षांत उतरायला ३५ वर्ष लागली. १९१५ ची गोष्ट. न्यूयॉर्कमध्यें अलेक्झांडर बेल आणि पस्तीसशे मैल दूर सान्फ्रान्सिकोला त्यांचा जिवाभावाचा सोबती वॉटसन- दोघेही पुढ्यांत टेलिफोन घेऊन बसले. त्या ऐतिहासिक प्रसंगाचे चित्र घ्यायला गर्दी करुन फोटोग्राफर उभे होते. टेलिफोनची घंटा वाजली. आणि थॉमस वॉटसनने काही वर्षांपूर्वी पलीकडच्या खोलींतून जो आवाज ऐकला तोच परिचित आवाज देशाच्या दुसऱ्या टोकापासून ऐकला.
बेल: (फिल्टर) मिस्टर वॉटसन्, जरा इकडे या. तुमची गरज आहे.
(संगीत)
निवेदक: अलेक्झांडर ग्रॅहाम बेल १९२२ साली वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी वारले. टेलिफोनच्या संशोधनांतून त्यांनी अमाप संपत्ति मिळवली. त्याहूनही टेलिफोन दैनंदिन जीवनांत गेलेला त्यांनी पाहिला. पण बेल टेलिफोन पद्धतीचा आज झालेला विकास त्यांच्या स्वप्नातही आला नसेल. जगाच्या या टोकाला राहाणाऱ्या एका माणसानं दुसऱ्या टोकाला राहाणाऱ्या माणसाला म्हणावं- हॅलो ऽ
... अपूर्ण (टेलिफ़ोनचा जन्म')

अभिप्राय लिहा अभिप्राय वाचा
पुलकित