|
गाण्याचे विशेष असे शिक्षण न घेताही पु.लं.ची गाण्यातील समज असामान्य
होती. खूप चांगले ऐकायला मिळावे ही धडपड अखेरपर्यंत होती. पु.लं.च्या
सांगीतिक कामगिरीचा विचार केला, तर बहुतेकांना बटाट्याच्या चाळीतील
'संगीतिका' हा त्यातील सर्वोत्कृष्ट आविष्कार वाटतो. दुर्देवाने
आमच्या पिढीला साक्षात पु. लं. कडून तो आविष्कार पाहण्याचे भाग्य
मिळाले नाही. पण त्या संगीतिकेत एकेका ओळीत पु.ल. एकेका गायकाची
गायकी दाखवीत. त्यामुळे जाणकाराला ती एक मेजवानीच असे. थोडक्यात
काय, पु.लं.ची कुठलीही कलाकृती सामान्यांपासून जाणकारांपर्यंत
प्रत्येकाला भरभरुन आनंद देत असे.
'साहित्य सूची' मधील एका लेखात 'श्री. गंगाधर महाम्बरे' म्हणतात,
डेक्कन क्विनच्या प्रवासात मला त्या दिवशी वेगवेगळ्या गायकांच्या
गायकीची अधूनमधून आठवण करुन देत पु.लं.नी 'बटाट्याच्या चाळी'मधील
पुढच्या ओळींची पारायणे केली:
'रामा चुकलो। मज करि क्षमा ॥
वस्त्रविश्रामा, पात्रप्रोक्षण कामा ॥
पर्णभरित, मुख, कर्ण विडीयुत ॥
कुरल केश शिर तेल विभूषित ॥'
या ओळीतील 'मज करि क्षमा' ऐकताना छोटागंधंर्वांची आठवण झाली तर
'वस्त्रविश्रा(आ)मा' ऐकताना बालगंधंर्वांची याद आली. 'पर्ण भरित
मुख' ही ओळ ऐकताना पंडितराव नगरकर तोंडात पानाचा विडा चघळत गात,
मा. दीनानाथ जशा अस्मानी ताना घेत तशी तानांची भेंडोळी सोडली.
आणि शेवटी 'कुरल केश शिर तेल विभूषित' म्हणताना सुरेश हळदणकरांच्या
'श्रीरंगा कमलाकांता'तील 'ब्रिजवासी नारी'नी हजेरी लावली!
|
या कॅसेटमध्ये पुलंच्या आवाजात खालील गाणी ऐकायला मिळतात:
बाई या पावसानं(१९४३)
पाखरा जा- नाटक 'वहिनी'(१९४६)
ललना कुसुम कोमला- नाटक 'वहिनी'(१९४६)
जा जा ग सखी- चित्रपट 'कुबेर'(१९४७)
उघड दार(१९४३) |
|
|
|